शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच नकुल भोईर यांचा मध्यरात्री दोनच्या सुमारास कौटुंबिक वादातून खून झाला आहे.
नकुल भोईर यांच्या खुनाचा आरोप त्यांची पत्नी चैताली भोईर यांच्यावर असून पोलिसांनी त्यांची पत्नी चैताली भोईर यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
नकुल भोईर यांचा पिंपरी चिंचवड शहरात चांगला जनसंपर्क आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत आपली पत्नी चैताली भोईर यांना नगरसेविका बनविण्यासाठी ते तयारी करत होते.
काल मध्य रात्री अचानक नकुल भोईर व त्यांच्या पत्नीत कौटुंबिक वाद झाला व या कौटुंबिक वादातून पत्नीनेच आपल्या पतीचा खून केला असल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री अशी अचानक हत्या झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुल भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. परंतु, शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. नकुल आणि चैताली यांच्यात वाद झाले. यातूनच प्रकृतीने भारदस्त असलेल्या चैतालीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली. दोन आणि पाच वर्षांची मुलं आतील रूममध्ये झोपली होती. तेव्हा हा सर्व थरार बाहेरच्या रूममध्ये सुरू होता. नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय होता. असं असताना नेहमीच्या वादातून आणि सतत चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीची हत्या केली आहे. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस घेत आहेत.








