spot_img
spot_img
spot_img

सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलग चौथा पराभव , गुजरात टायटन्स विजयी

रविवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स यांनी सनरायझर्स हैदराबाद संघाचा ७ विकेटस् आणि २० चेंडू शिल्लक ठेवून हरवले. हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे. मोहम्मद सिराज आणि सहकाऱ्यांनी हैदराबादचा डाव ८ बाद १५२ धावांत रोखल्यानंतर गुजरातने हे आव्हान १६.४ षटकांत पूर्ण केले. सिराजने १७ धावांत ४ विकेटस् घेतल्या तर शुभमन गिलने ६१ धावा करून विजयास हातभार लावला.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैदराबादचे १५३ धावांचे आव्हान गुजरातने लीलया पार केले, पण त्यांची सुरुवातही खराब झाली होती. साई सुदर्शन (५) आणि जोश बटलर (०) हे दोन मोठे मासे स्वस्तात गळाला लागले होते, पण याचा फायदा हैदराबादी गोलंदाजांना उठवता आला नाही. कर्णधार शुभमन गिलने आधी वॉशिंग्टन सुंदर आणि नंतर शेरफन रुदरफोर्ड याच्या साथीने विजयी लक्ष्य गाठले. गिल आणि सुंदर यांनी ५६ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. सुंदर ४९ धावांवर बाद झाल्यानंतर गिलने रुदरफोर्ड सोबत २१ चेंडूंत ४७घावा जोडल्या. गिल ६१ (४३ चेंडू) तर रुदरफोर्ड ३५ (१६) हे दोघे नाबाद राहिले.तत्पूर्वी, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथमफलंदाजी करण्यासाठी बोलावले. सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सलामीला फलंदाजी केली. पण, पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडचा मोठा अडथळा मोहम्मद सिराजने दूर केला. त्यानंतर अभिषेकला इशान किशन साथ देत होता, पण ५ व्या षटकात अभिषेक शर्मालाही सिराजनेच राहुल तेवतियाच्या हातून १८ धावांवर बाद केले. इशान किशनही फार काही करू शकला नाही, त्याला १७ धावांवर प्रसिद्ध कृष्णाने इशांत शर्माच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संयमी फलंदाजी करत डाव पुढे नेला.

त्यांना मोठ्या धावा मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी घेऊ दिल्या नव्हत्या. त्यामुळे हैदराबादची फलंदाजी धिम्या गतीने होत होती. नितीश आणि क्लासेन यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली, पण त्यानंतर लगेचच क्लासेनला २७धावांवर साई किशोरने १४ व्या षटकात क्लीन बोल्ड केले. नितीशलाही १६ व्या षटकात ३१ धावांवर साई किशोरनेच बाद केले. त्याचा झेल रशीद खानने घेतला. कामिडू मेंडिसलाही १ धावेवरच प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. अनिकेत वर्माचा मोठा अडथळाही सिराजनेच १९ व्या षटकात पायचीत पकडले. अनिकेत १८ धावांवर बाद झाला. याच षटकात त्याने इम्पॅक्ट सबस्टिट्यूट म्हणून मैदानात आलेल्या सिमरजित सिंगलाही त्रिफळाचीत करत हैदराबादला आठवा धक्का दिला.

तरी शेवटी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सच्या काही आक्रमक शॉटस्मुळे संघाला १५० धावांचा टप्पा पार करता आला. हैदराबादने २० षटकांत ८ बाद १५२ धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्स ९ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकारासह २२ धावांवर नाबाद राहिला. मोहम्मद शमी ६ धावांवर नाबाद राहिला.

गुजरातकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेटस् घेतल्या. त्याने ४ षटकांत या ४ विकेटस् घेताना १७धावाच खर्च केल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि आर. साईकिशोर यांनी प्रत्येकी २ विकेटस् घेतल्या.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!