शबनम न्यूज | प्रतिनिधी
अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा आणि मार्गदर्शिका संध्या सव्वालाखे यांनी सायली नढे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांची पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा पदी फेरनिवड केली आहे. त्यांच्या गतकाळातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पक्षाने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
सायली नढे यांना यापूर्वी शहराध्यक्षा म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली तेव्हा त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात महिला संघटनाला बळकटी देण्यासाठी ठोस पावले उचलली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्या २५ वर्षांपासून रुजलेल्या भ्रष्टाचाराला त्यांनी चव्हाट्यावर आणले आणि शहरातील पाणीप्रश्नासारख्या जटिल समस्येवर उपोषणाच्या माध्यमातून आवाज उठवला. पक्षाच्या आव्हानात्मक काळातही त्यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहत पक्षाची घसरलेली ताकत पुन्हा वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले. या सर्व कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपवली आहे.
नढे यांनी आपल्या निवडीबद्दल आभार व्यक्त करताना सांगितले, “अलकाजी लांबा मॅडम आणि संध्याताई सव्वालाखे यांचे मी मन:पूर्वक आभार मानते. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरून, पिंपरी-चिंचवडमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि काँग्रेसच्या विचारधारेला बळकटी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” त्यांच्या या फेरनिवडीमुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नढे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महिला काँग्रेस सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नढे यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात महिला काँग्रेसच्या कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.