शबनम न्यूज | प्रतिनिधी
निगडी प्राधिकरणातील नियोजित महापौर निवास मैदानावर शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झालेल्या सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या दिवाळी पहाट मैफलीला सुमारे साडेचार हजारांहून अधिक रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी विधानपरिषद आमदार अमित गोरखे म्हणाले की, ‘पंडित वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीतातील गायकीचा वारसा राहुल देशपांडे अतिशय समर्थपणे रसिकांपर्यंत अन् विशेषत: तरुणाईपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांनी या दीपावलीतील ही पहिलीच मैफल प्राधिकरणातील रसिक श्रोत्यांसाठी केली ही खूप आनंदाची बाब आहे!’ यावेळी माजी महापौर आर. एस. कुमार यांची विशेष उपस्थिती होती. आयोजक माजी उपमहापौर शैलजा मोरे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा पदाधिकारी सलीम शिकलगार, अरुण थोरात आणि अतुल इनामदार यांनी राहुल देशपांडे यांच्यासह वादक कलाकारांचे स्वागत केले; तसेच उपस्थित श्रोतृवर्गाला दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
राहुल देशपांडे यांनी अहिर भैरव रागातील ‘अलबेला सजन आयो रे…’ या द्रुत बंदिशीतील खयालाने मैफलीचा प्रारंभ केला. ‘तुज मागतो मी आता…’ या गणेशस्तवनानंतर संगीत ‘सौभद्र’मधील ‘प्रिये पहा…’ आणि ‘राधाधर मधुमिलिंद…’ तसेच ‘कट्यार काळजात घुसली’मधील ‘तेजोनिधी लोहगोल…’ या नाट्यगीतांनी त्यांनी रसिक श्रोतृवर्गाची उत्स्फूर्त दाद मिळवली. मैफलीच्या उत्तरार्धात ‘मोगरा फुलला…’ ही ज्ञानेश्वरमाउलींची भक्तिरचना सादर करीत देशपांडे यांनी श्रोत्यांना भक्तिरसात भिजवले; तर ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…’ , ‘पानी रे पानी रे…’ , ‘अपनेही रंग में रंग दे…’ अशा वैविध्यपूर्ण फ्युजनने संमिश्र श्रवणानंद दिला. अर्थातच टाळ्यांचा ठेका धरत श्रोत्यांनी त्याला वन्स मोअरची दाद दिली. किशोरकुमार यांच्या मूळ आवाजातील ‘हम बेवफा हरगीज न थे…’ या सदाबहार गीताच्या रीमिक्सला श्रोत्यांनी वादकांसह पुन्हा एकदा वन्स मोअर देत पसंतीचे शिक्कामोर्तब केले. ‘कट्यार काळजात घुसली’मधील ‘दिल की तपीश हैं…’ या गीताने मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांना ‘कानडा राजा पंढरीचा…’ या भक्तिरचनेच्या उत्कट सादरीकरणाने भक्तिरसात न्हाऊ घातले. भारावलेल्या जनसमुदायाने विठुनामाचा गजर करीत उभे राहून सर्व कलाकारांना मानवंदना दिली. राहुल देशपांडे यांना रितेश (गिटार), निनाद (बासरी), रोहन (ऑक्टोपॅड), विशाल (की बोर्ड), मिलिंद (हार्मोनियम) आणि निखिल (तबला) यांनी सुरेल साथसंगत केली. संतोष यांनी संगीत संयोजन केले. अक्षय मोरे यांनी निवेदन केले.








