अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ
शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिखली येथील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ युवा नेते यश दत्ताकाका साने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरेवास्तीतील नागरिकांच्या वतीने नारळ फोडून करण्यात आला.
अंगणवाडी रोड व चिंचेचा मळा ते वाघू साने चौक हा चिखली परिसरातील प्रमुख मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला होता. नागरिक, विद्यार्थी व वाहनचालक यांना रोज त्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. पावसाळा संपूनही रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने अखेर युवा नेते यश साने यांच्या नेतृत्वात नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले होते. यश साने यांनी केलेल्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

या रस्त्यावर काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनचे काम पूर्ण झाले होते, मात्र त्यानंतर मनपाच्या वतीने रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे उखडला गेला होता. परिणामी नागरिकांना दररोज खड्डे, धूळ आणि असुविधांचा सामना करावा लागत होता.
या प्रश्नांवर यश साने यांनी सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा करून अखेर हा प्रश्न मार्गी लावला आहे. आज या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याचा अत्यंत आनंद आणि समाधान वाटत असल्याची भावना यश साने यांनी व्यक्त केली. या भूमिपूजनानंतर मोरेवस्तीतील नागरिकांनी त्यांचा सत्कार करून आपुलकी व्यक्त केली.
नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा विकासकामांना गती मिळते, हा माझा ठाम विश्वास आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि दर्जेदार मार्ग उपलब्ध होईल. तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासात या रस्त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, याची खात्री आहे.
यश साने, युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस.







