शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम ३० सप्टेंबरपासून सुरू झाला असून नागरिक ६ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करू शकतात.
या मोहिमेसाठी विभागीय आयुक्त पुणे चंद्रकांत पुलकुंडवार हे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त असून, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम पाहतील.
या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे कार्यालयातील सर्व पदवीधर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या वेळी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अशा प्रकारचे विशेष नोंदणी कॅम्प आयोजित करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “जास्तीत जास्त पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही बळकट करावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही या विशेष कॅम्पला भेट दिली आणि सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.