भाजपा शहर सचिव नवनाथ ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुनावळे- परिसरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाल्याने नागरिकांना, वाहनचालकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरील ख़ड्डे बुजवून दुरुस्ती व डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी भाजपाचे शहर सचिव श्री नवनाथ ढवळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार महापालिकेकडे पाठपुरावा करून रस्त्यांवरील खड्डे बुजवून डांबरीकरण काम अखेर मार्गी लागले आहे. ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, परिसरातील नागरिकांना, वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
पुनावळेतील श्रेया हौसींग सोसायटी, ४५ श्वासत ॲव्हेन्यु व श्रीहंस हौसिंग सोसायटी समोरील रस्ता उखडला होता. रस्त्यावर खड्डे होते. रस्ता दुरुस्तीसाठी नागरिक मागणी करत होते. पाऊस बंद होताच तत्काळ या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी सचिव नवनाथ ढवळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेत रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकऱणाचे काम सुरु केले. तसेच कोयतेवस्ती, गायकवाड नगर , काटे वस्ती, ढवळेनगर परिसरात रस्त्यांची कामे सुरु आहेत. या रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांसोबत शहर सचिव नवनाथ ढवळे यांनी पाहणी दौरा केला. संबधिंत अधिकारी ठेकेदारांना उत्कृष्ट दर्जाची कामे झालीच पाहिजेत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
पुनावळे परिसर झपाट्याने विकसित होत आहे. मोठ-मोठे गृहप्रकल्प याठिकाणी साकारले जात आहेत. परिसराची लोकसंख्या वाढते आहे. त्यानुसार कनेक्टीव्हीटी म्हणजे रस्ते सुसज्ज असणे आवश्यक आहेत. सध्या परिसरातील रस्त्यांची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी डांबरीकऱणाचे काम करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्याठिकाणी उत्कृष्ट दर्जाची कामे व्हावीत यासाठी पाहणीदौरा करून सूचनाही दिल्या आहेत.
– भाजपा शहर सचिव नवनाथ ढवळे
मागील काही महिन्यांपासून आमच्या श्रीहंस हौसिंग सोसायटी समोरील रस्ता पूर्ण उखडलेला होता. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत होते. यासाठी आम्ही सर्व सोसायटीधारक मिळून भाजपाचे शहर सचिव नवनाथ ढवळे यांची भेट घेतली. रस्त्यावरील खड्डे भरून डांबरीकरणाची मागणी केली. त्यांनी तत्काळ शहर अभियंता मकरंद निकम यांना संपर्क करून, निवेदन देऊन काम करण्याची मागणी केली. अखेर या कामाला यश मिळाले असून, रस्त्याचे डांबरीकरण झाले.
– अमित न्योबाड
श्रीहंस हौसिंग सोसायटी रहिवासी
पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने खड्डे पडले आहेत. रस्ते उखडले आहेत. त्या रस्यांवरील खड्डे भरून डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुनावळेतून मागणी केल्यानंतर तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
– शहर अभियंता मकरंद निकम