शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पायल गोखले संकल्पित ‘नृत्य रंग तरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेत ६० कलाकारांनी भाग घेतला होता.
यामध्ये नृत्य शारदा कला मंदिरच्या स्नेहल सोमण, नुपूर नृत्यालयच्या सुमेधा गाडेकर, कलासाधना भरतनाट्यम अकादमीच्या सुवर्णा बाग तसेच नृत्योपासना भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यालयच्या वरदा वैशंपायन व योगिता भसीन यांनी आपल्या विद्यार्थी कलाकारांसह कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी, लोकनृत्य, नृत्य नाटिका सादर केली.
मराठी भाषेचा आत्मा केवळ शब्दांत नाही, तर भाव, लय आणि अभिव्यक्तीतही सामावलेला आहे. नृत्यकलेच्या माध्यमातून या भावविश्वाला स्पर्श करत, कलाकारांनी मराठी गीत, काव्य आणि लोकपरंपरा यांना नव्या नृत्यरूपात साकार केले. नृत्याद्वारे अभिव्यक्त झालेली मराठी गीते, ओवी, अभंग आणि लोकनाट्यांचे पद्य हे भाषेच्या सौंदर्याला नवसंजीवनी देणारे ठरले. या कार्यक्रमातून मराठी भाषा, संस्कृती आणि कलाकौशल्य यांचा संगम अनुभवायला मिळाला अश्या भावना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आकुर्डी प्राधिकरणातील छोटे नाट्यगृह, ग.दि. माडगूळकर नाट्यगृह येथे प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांचा शरद आढाव प्रस्तुत दृकश्राव्य अविष्कार सादर झाला. यामध्ये कांचनमृग, अमृत साहित्य वेगळी संकल्पना, अस्थी स्तोत्र या कथा दाखविण्यात आल्या. रसिक प्रेक्षकांनी देखील एकदम शांततेत संपूर्ण कार्यक्रम पाहिला व ऐकला.
जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनशैलीत मानवी मनाचे गूढ, भावनिक संघर्ष आणि अस्तित्ववादी प्रश्नांचे सूक्ष्म चित्रण दिसते. त्यांच्या कथांतील दृश्यांमधून मराठी भाषेतील वैचारिक खोली आणि अभिव्यक्तीचा विलक्षण प्रत्यय आला. या दृकश्राव्य सादरीकरणाने केवळ कथांचे सादरीकरण नव्हे, तर मराठी साहित्यातील गूढ, तत्त्वचिंतनशील आणि संवेदनशील बाजू प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडली. त्यामुळे मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्याचा आणि साहित्यिक परंपरेचा एक अर्थपूर्ण अनुभव रसिकांना लाभला.
दुसऱ्या सत्रात कुमार करंदीकर यांनी ‘गझल, गीत, आणि काव्य संगीत’ हा कार्यक्रम सादर केला. मराठी मधील जुन्या नव्या गाण्यांचा धून ऐकवत त्यांनी प्रेक्षकांना आपल्या जादुई आवाजात खिळवून ठेवले. यावेळी गायक श्रुती करंदीकर, तबला वादक विवेक भालेराव, गीतार वादक डॉ. सतीश गोरे यांनी उत्तम साथ दिली.
या कार्यक्रमात कुमार करंदीकर यांनी पु. ल. देशपांडे, सुरेश वाडकर, सुरेश भट यांच्यासह जुन्या मराठी गझल गात उपस्थितांची मने जिंकत वाहवा मिळवली. यावेळी कुमार करंदीकर यांनी स्वलिखित ‘शब्द शब्द साद मनीची… सूर चेताविती या मनीची’ ही गझल गायिली. त्यानंतर समाजातील समस्या आणि मानवी वृत्तीवर भाष्य करणारी ‘वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे… पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे’ तसेच ‘उंबराठा’ चित्रपटातील ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच गीत मी गात आहे’ या सह विविध गझल सादर करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
गझल या अभिजात काव्यप्रकारातून मराठी भाषेची अभिव्यक्ती अधिक समृद्ध झाली आहे. शब्दांच्या लयीतून, भावांच्या तरलतेतून आणि स्वरांच्या माधुर्याने मराठी भाषेचे सौंदर्य नव्या अंगाने खुलते, हे या कार्यक्रमातून जाणवले. करंदीकर यांच्या गायकीतून मराठी शब्दांना नव्या भावार्थाची झळाळी मिळाली, तर प्रेक्षकांनीही रसिकतेने प्रत्येक ओळीचा आस्वाद घेत मराठी काव्यसंगीताचा अविस्मरणीय अनुभव घेतला.