शबनम न्यूज , प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. एका वरिष्ठ वकिलाने भारताचे मुख्य न्यायमूर्ती मा. भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेवर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
“सर्वोच्च न्यायालय हे आपल्या लोकशाहीतील न्यायाचे सर्वोच्च मंदिर आहे. मा. मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न म्हणजे आपल्या लोकशाही आणि न्यायव्यवस्थेच्या मुळावर प्रहार आहे. अशा घटना सुसंस्कृत समाजात असूच शकत नाहीत.” अशा तीव्र शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे.
ते पुढे म्हणाले की, न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि पावित्र्य जपणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे. “न्यायव्यवस्थेला कमी लेखण्याचा किंवा अनादर करण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवर आघात आहे. या लाजिरवाण्या कृत्यात सामील असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली पाहिजे,” असे अजित पवार म्हणाले.
न्यायव्यवस्थेबद्दल आपला पूर्ण पाठिंबा दर्शवत अजित पवार यांनी नागरिकांना न्याययंत्रणेवरील विश्वास कायम ठेवण्याचे आवाहन केले. “आपल्या लोकशाहीची ताकद न्यायसंस्था आणि तिच्या सन्मानातच आहे,” असेही ते म्हणाले.








