शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत (पिफ) दि. ११ आणि १२ ऑक्टोबर या दोन दिवशी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात विशेष ‘मान्सून एडिशन‘चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्र शासन आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांनी याचे आयोजन केले आहे. हा महोत्सव विनामूल्य असून, ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य‘ या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती पिफच्या आंतरराष्ट्रीय सिनेमा निवडच्या उपसंचालिका आदिती अक्कलकोटकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
त्या म्हणाल्या की, या महोत्सवात रसिकांना सहा जागतिक चित्रपट पाहता येतील. शनिवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ‘The Time it Takes’, दिग्दर्शक फ्रान्सिस्का कोमेन्सिनी (फ्रान्स, इटली), सायं. ६.15 वाजता ‘Plastic Guns’, दिग्दर्शक जीन–क्रिस्टोफ म्युराइज (फ्रान्स) आणि रात्री ८.१५ वाजता ‘My Everything’, दिग्दर्शक अॅनी सोफी बेली (फ्रान्स) हे चित्रपट दाखविले जातील. रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी दु. ४ वाजता ‘Delirio’, दिग्दर्शक अॅलेक्झांड्रा लॅटिशेव्ह सालाझार (कोस्टारिका, चिली), सायं. ५.३० वाजता ‘The Wailing’, दिग्दर्शक पेड्रो मार्टिन सॅलेरो (स्पेन, फ्रान्स, अर्जेंटिना) आणि रात्री ७.३० वाजता ‘Mongrel ’, दिग्दर्शक वि लियांग चियांग, यू कियाओ यिन (तैवान, सिंगापूर, फ्रान्स) हे चित्रपट दाखविले जातील.
या महोत्सवासाठी जगभरातून आलेल्या चित्रपटांतून या सहा चित्रपटांची निवड केली असून, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दरवर्षी होणाऱ्या ‘पिफ‘ बरोबर रसिकांना मधल्या काळातही आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहता यावेत, या उद्देशाने ‘मान्सून एडिशन‘चे आयोजन केले आहे, अशी माहिती महोत्सवाच्या उपसंचालिका आदिती अक्कलकोटकर यांनी पत्रकाद्वारे दिली.