पिंपरी – थेरगाव डांगे चौक परिसरात वाहतूक कोंडी वाढली आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी ग्रेड सेपरेटरची लांबी वाढवावी. थेरगाव गावठाणकडे जाणारी वाहतूक सुरळीत करावी अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
थेरगाव परिसरातील वाहतूक नियोजनाबाबत खासदार बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी महापालिकेच्या विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, स्थापत्य प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भोजणे,
शहरी दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार, दळणवळण विभागाचे कनिष्ठ अभियंता गिरीश गुठे,
प्रकल्प सल्लागार राज अंतुर्लीकर, माजी नगरसेवक निलेश बारणे उपस्थित होते.
थेरगावमधील डांगे चौक अतिशय वर्दळीचा आहे. या चौकातून आयटीनगरी हिंजवडी, पुण्याकडे जाणारी वाहतूक जाते. त्यामुळे चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्यावेळी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. कोंडीमुळे अभियंत्यांना विलंब होतो. त्याचा कामावर परिणाम होत आहे. थेरगाव गावठाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील अशीच परिस्थिती असते. त्यामुळे हा परिसर कोंडीमुक्त करणे आवश्यक आहे. थेरगाव डांगे चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता ग्रेड सेपरेटरची लांबी वाढवावी. वाहतूक कोंडी सोडविण्याची सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.