spot_img
spot_img
spot_img

घावटे अद्भुत लोहचुंबक आहेत! – प्रा. बाळकृष्ण माडगूळकर ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’

शब्दधन काव्यमंचचा उपक्रम
पिंपरी (दिनांक : ०६ ऑक्टोबर २०२५) ‘आपल्या अंतरंगातील सद्गुणांनी समाजातील विविध घटकांना आपल्याकडे खेचून जिव्हाळ्याचे स्नेहबंध प्रस्थापित करणारे राजेंद्र घावटे अद्भुत लोहचुंबक आहेत!’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते प्रा. बाळकृष्ण माडगूळकर यांनी कुसुमावर्त, शिवतेजनगर, चिखली प्राधिकरण येथे रविवार, दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी काढले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे यांचा त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री घावटे यांच्यासह विशेष सन्मान करताना प्रा. बाळकृष्ण माडगूळकर बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण बहिरवाडे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.
ह. भ. प. प्रकाश घोरपडे यांच्या गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

याप्रसंगी नारायण बहिरवाडे, रमेश वाकनीस, जितेंद्र छाबडा, भास्कर रिकामे, सुरेश कंक यांनी आपल्या मनोगतातून; तसेच शोभा जोशी, कांचन नेवे, प्रतिमा काळे यांनी आपल्या कवितांमधून राजेंद्र घावटे यांच्या सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक आणि साहित्य क्षेत्रांतील योगदानाबद्दल माहिती दिली; तसेच जयश्री घावटे यांचे अभीष्टचिंतन केले. सत्काराला उत्तर देताना राजेंद्र घावटे यांनी, ‘वडिलांची अतिशय हलाखीची आर्थिक परिस्थिती, अपंग आई अशा विपरीत अन् खडतर परिस्थितीवर मात करून मला उच्च शिक्षण घेता आले. फक्त ७५ रुपयांची शिदोरी सोबत घेऊन मी अनवाणी पायांनी पुण्यनगरीत आलो. आईवडिलांचे आशीर्वाद आणि विवाहपश्चात पत्नीची प्रेरणा यामुळेच सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि साहित्य क्षेत्रांत थोडेफार योगदान देऊ शकलो!’ अशी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी राधाबाई वाघमारे, शामला पंडित, वर्षा बालगोपाल, योगिता कोठेकर, अरुणा वाकणीस, रेवती साळुंके, राजेंद्र पगारे, नामदेव हुले, पांडुरंग सुतार, प्रकाश ननवरे, पी. बी. शिंदे, अरविंद वाडकर, राजाराम वंजारी, श्रीकांत मापारी, यशवंत कन्हेरे, प्रदीप सपकाळ, बालकिसन मुत्याळ, दत्तात्रय बहिरवाडे, सुभाष पागळे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. तानाजी एकोंडे यांनी प्रास्ताविक केले. मुरलीधर दळवी, प्रतीक घावटे, ऋतुजा घावटे आणि प्राजक्ता ननवरे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री गुमास्ते यांनी आभार मानले. प्रकाश घोरपडे यांनी सादर केलेल्या भैरवी गायनाने समारोप करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!