मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीवा जागृत करणारे हे नाटक प्रेक्षकांसाठी विचारप्रवृत्त करणारे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये स्थानिक कलाकारांचे सादरीकरण
पिंपरी, ४ ऑक्टोबर २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित, अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त शहरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एकांकिका सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लेखक-दिग्दर्शक राहुल काळोखे यांची ‘मृत्युमनी डॉट कॉम’, शंकर नवरे लिखित आणि प्रथमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘डाग’ या एकांकिकांचा समावेश होता. यात मनोरंजनासोबत सामाजिक जाणिवा जागृत करणाऱ्या विषयावर भाष्य करत प्रेक्षकांना विचारप्रवृत्त केले.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वयक किरण गायकवाड, अखिल पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह शहरातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या सत्रात लेखक-दिग्दर्शक राहुल काळोखे यांच्या दिग्दर्शनातून साकार झालेल्या ‘मृत्युमनी डॉट कॉम’ या प्रयोगाने समाजातील प्रेमी युगुलांना भेडसावणाऱ्या धर्म जातीभेद, हुंडा प्रथा आणि पारंपरिक अडथळ्यांचा वेध घेतला. या सामाजिक विषयाला पारंपरिक कथनशैली न वापरता भीतीदायक भयपट शैलीत मांडत सामाजिक वास्तवाला भिडणारा आणि प्रेक्षकांना थरारून टाकणारा अनुभव ठरला. यानंतर कुटुंबव्यवस्थेतील नाती, भावंडांमधील जिव्हाळा आणि त्यातील भावनिक बंध यांना स्पर्श करणारी शंकर नवरे लिखित आणि प्रथमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘डाग’ ही एकांकिका सादर झाली. या एकांकिकेने प्रेक्षकांना भावनिक आणि विचारप्रवर्तक अनुभव दिला. मंचावरील दृश्यात्मकतेत अथर्व कांबळे यांच्या नेपथ्याने कथानकाला अधिक वास्तवाची छटा दिली. घरगुती वातावरण, भावंडांच्या आयुष्यातील संघर्ष आणि तणाव यांना अधोरेखित करणारी नेपथ्य रचना एकांकिकेच्या प्रभावात भर घालणारी ठरली. त्याचबरोबर अपूर्वा कुलकर्णी यांनी दिलेले संगीत एकंदर कथानकाच्या लयीत भावनिकता आणि ताणतणावांची जोड देणारे ठरले. संगीत आणि ध्वनी परिणामांमुळे प्रेक्षकांच्या मनातील संवेदना अधिक तीव्र झाल्या. अन्याय, असमानता आणि नात्यांमधील ताणतणाव यांवर प्रकाश टाकत बदलासाठी सजग होण्याचे आवाहन या नाटकातून करण्यात आले. संघर्षांवर मात करून जगण्याची उमेद जिवंत ठेवावी, असा प्रेरणादायी संदेशही यातून व्यक्त झाला. नाटकाच्या लेखनाचा संवेदनशील दृष्टीकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण, नाटकात साकारलेल्या प्रमुख भूमिकांमधून कलाकारांनी समाजातील स्त्री-पुरुषांचे नाते, त्यातील संघर्ष आणि परंपरांच्या बंधनांचा वेध घेतला. स्त्रीच्या संघर्षांची कहाणी मांडताना कलाकारांनी आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. समाजातील वास्तवाचे जिवंत चित्रण करणाऱ्या या नाटकाने प्रभावी लेखन, दिग्दर्शन आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची दाद मिळवली.
दरम्यान, वसंत सबनीस लिखित व राजेश शिंदे दिग्दर्शित ‘विच्छा माझी पुरी करा’ हे विनोदी नाटक सादर करण्यात आले.