spot_img
spot_img
spot_img

‘लाभले आम्हास भाग्य’ प्रयोगातून रसिकांनी अनुभवला मराठी भाषेचा वैभवशाली व समृद्ध वारसा

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाला रसिकांकडून मिळतेय भरभरून दाद


पिंपरी, ४ ऑक्टोबर २०२५ : शब्दांचे मोती, कवितांची ओढ, मराठी गीतांची गोडी आणि नाट्यकलेचा आविष्कार… या सर्वांचा संगम साधत ‘लाभले आम्हास भाग्य’ या नाट्यप्रयोगातून मराठी भाषेचा साहित्यिक प्रवास रंगमंचावर उजळून निघाला. या प्रयोगात अभंगांपासून गाण्यांपर्यंत, बहिणाबाईंच्या कवितांपासून पु.ल. देशपांडे यांच्या विनोदी लिखाणापर्यंत, संत साहित्यापासून ग.दि. माडगूळकर, कुसुमाग्रज आणि विं.दा. करंदीकर यांच्या लेखनापर्यंत मराठी साहित्याची समृद्ध परंपरा एका पटावर रेखाटली गेली. नव्या पिढीमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीचा समृद्ध वारसा मांडला गेला पाहिजे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री. भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय भोसरी व हुतात्मा चाफेकर सार्वजनिक ग्रंथालय चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘लाभले आम्हास भाग्य’ या मराठी नाटकाचे सादरीकरण झाले.

सुनिल बर्वे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, गौतमी देशपांडे, मृण्मयी देशपांडे आणि अजित परब या नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या या नाटकाला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी भाषा, तिचा समृद्ध वारसा, साहित्य-संगीत आणि संस्कृती यांचा एकत्रित आविष्कार घडवणाऱ्या ‘लाभले आम्हास भाग्य’ नाटकातील संवाद कधी प्रेक्षकांना विचार करायला लावणारे ठरले, तर कधी कवितेच्या ओळींनी अंतर्मनात चिंतनाचे तरंग उमटवले. रसिक प्रेक्षकांनी या नाट्य प्रयोगाला भरभरून प्रतिसाद देत टाळ्यांची दाद दिली.

नाटकाची सुरुवात महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ याने झाली. त्यानंतर कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य’ या अजरामर कवितेने वातावरण भारावून टाकले. वारकरी संप्रदायाचे दर्शन घडवणारी ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ आणि ‘माझे माहेर पंढरी’ या गीतांनी रसिकांना भक्तिरसात न्हाऊ घातले.

कलाकारांनी ग.दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, विं.दा. करंदीकर, बहिणाबाई आदी साहित्यिकांच्या रचना रंगमंचावर खुलविल्या. ‘ग साजणी’, ‘गोमू संगतीने माझ्या तू येशील का’ यांसारखी गाणी ते ‘बगळ्यांची माळ फुले’ पर्यंत गोडवा आणि विविधतेचा संगम अनुभवायला मिळाला. ग.दि. माडगूळकरांची ‘जोगीया’ कविता, कवी राजा बडे यांची लावणी, कुसुमाग्रज यांची ‘गाभारा’ कविता, विं.दा. करंदीकर यांचे ‘देणाऱ्याने देत जावे…’ हे विचार आणि बहिणाबाईंच्या कविता, गीत रामायण मधील ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘दैव जात दुःखी धरते’ यांसारख्या रचना यांनी कार्यक्रमाला साहित्यिक सखोलता दिली. याशिवाय ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘कट्यार काळजात घुसली’ या नाट्यप्रयोगातील प्रसंगांनी प्रेक्षकांना मराठी रंगभूमीचा वैभवशाली प्रवास अनुभवायला लावला.

पु.ल. देशपांडे यांच्या ‘माझे खाद्य जीवन’ आणि ‘उरले सुरले’ या विनोदी लिखाणांचे आनंद इंगळे यांनी केलेले सादरीकरण प्रेक्षकांना हसवून गेले. अखेरीस ‘इंद्रायणी काठी’ या गीताने या साहित्यिक सोहळ्याचा समारोप झाला. या नाट्यप्रयोगातून मराठीची भाषेची शास्त्रीयता, साहित्यिक समृद्धी, नाट्यवैभव आणि विनोद या सर्व पैलूंचा बहारदार मिलाफ अनुभवायला मिळाला. रसिकांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद देत उभे राहून दाद दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!