शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे : फॅशन जगतासाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथील परंपरा, साजरे होणारे जगातील सर्वाधिक सण, येथील हवामान आणि जनतेच्या गरजा, आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे कपडे, दागिने आदींची निर्मिती करावी, असे सांगतानाच या मोठ्या बाजारपेठेचा या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा, असा सल्ला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिला.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या २२ व्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि स्कूलचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मिलिंद लेले, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विकास कक्षाच्या सदस्य डॉ. मंजू हुंडेकर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य जयंत इनामदार, स्कूलच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती मोहना कदम, प्राचार्य डॉ. गरिमा भल्ला आदी उपस्थित होते.
मंत्री सावकारे पुढे म्हणाले, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून त्यातील आपला ग्राहक कोणता हे निश्चित करून आणि त्यांच्या गरजा, मागणींचा अभ्यास करून फॅशन व्यवसाय, उद्योगात निर्मिती करावी. विद्यार्थिनींनी स्पर्धेच्या युगात प्रथम स्वतःला या क्षेत्रात स्थैर्य मिळविताना काही वेगळे करण्याचा, सर्जनशीलतेचा प्रयत्न करावा. भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक सण, उत्सवाला काही ना काही शास्त्रीय आधार असून या परंपरेला पुढे आणल्यास तुमचीही प्रगती होईल. आपण जे करू ते देशासाठी करू या विचाराने प्रेरित व्हावे, असेही ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शाश्वतता या संकल्पनेवर मोठा भर आहे. प्रत्येक वस्तूचा पुनर्वापर करून नवनिर्मिती करत या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी संस्थेने स्थापनेपासूनच केली आहे. त्यातून महर्षी कर्वे यांची दूरदृष्टी दिसून येते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
श्री. सावकारे पुढे म्हणाले, केंद्र शासनाने टेक्निकल टेक्सटाइल ही नवी संकल्पना समोर आणली असून त्यात वस्त्रोद्योगात वापरल्या जाणारे रंग (डाय) बनविणाऱ्या यंत्रांसाठी अनुदान देण्यात येते. राज्य शासन देखील या संकल्पनेला पुढे घेऊन काम करत आहे.
रेशमाचा धागा तेवढ्याच जाडीच्या लोखंडाच्या धाग्यापेक्षा अनेक पटीने मजबूत तरीही वजनाने हलका असल्याने सैनिकांसाठी बुलेटप्रूफ जॅकिटे बनविण्यासाठी त्याचा उपयोग करण्याबाबत संशोधन सुरू आहे. अशा अनेक नवनव्या संधी या क्षेत्रात निर्माण होत असून त्यांचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.
प्राचार्य गरिमा भल्ला यांनी संस्थेचा अहवाल सादर केला, त्या म्हणाल्या, ही संस्था फॅशन डिझाइन क्षेत्रातील देशातील एक अग्रमानांकित संस्था आहे. आजच्या पदवी प्रदान सोहळ्यात संस्थेमार्फत ५ सुवर्ण पदके, १९५ बी. डिझाइन पदवी आणि ११ एम. डिझाइन या पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येत आहेत. संस्थेने मँचेस्टर मेट्रोपॉलिटन विद्यापीठ, डी मॉन्टफर्ड आदी विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. संस्थेतील विद्यार्थीनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाईन स्पर्धांमध्ये सहभागी घेऊन यशस्वी झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रीन फॅशन इंडिया परिषदेचा अहवाल सादर करण्यात आला.
या प्रसंगी प्राध्यापक, पालक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.