spot_img
spot_img
spot_img

नागरिकांना डिजिटल माध्यमातून पारदर्शक व सुलभ प्रशासन देणे हे महानगरपालिकेचे प्राधान्य

महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे वेबपेजचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते अनावरण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

डिजिटल माध्यमातून पारदर्शक व सुलभ प्रशासन देणे हे महापालिकेचे प्राधान्य आहे. समाज विकास विभागाच्या सर्व योजना एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्याने अधिकाधिक पात्र नागरिकांना या योजनांचा लाभ मिळेल, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या कामकाजात तांत्रिक पारदर्शकता व गतीशीलता आणण्यासाठी बनविण्यात आलेल्या स्वतंत्र वेबपेजच्या अनावरण प्रसंगी आयुक्त सिंह बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले,सह आयुक्त मनोज लोणकर, नगर सचिव मुकेश कोळप, समाज विकास विभाग उप आयुक्त ममता शिंदे यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज विकास विभागामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये महिला व बालकल्याण योजना, दिव्यांग कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याण योजना आणि इतर अनेक उपयोजना यांचा समावेश आहे. या सर्व योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक मदत, सुविधा व लाभ दिले जातात. या सर्व योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना अधिक सुलभतेने उपलब्ध व्हावी, तसेच अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता व वेग वाढावा यासाठी समाज विकास विभागाचे स्वतंत्र वेबपेज तयार करण्यात आले आहे.

नव्याने बनविण्यात आलेल्या https://www.pcmcindia.gov.in/samaj_vikas या वेबपेजच्या माध्यमातून नागरिकांना समाज विकास विभागाच्या सर्व योजनांची माहिती, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज प्रक्रिया तसेच विभागाने राबविलेले उपक्रम याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे. सर्व लाभार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि पात्र लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावरील “महत्वाचे” या सदरामध्ये “समाज विकास विभाग” या उपसदारातून नागरिकांना या नव्या वेबपेजला भेट देता येणार आहे. या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या कामकाजात तांत्रिक पारदर्शकता व गतीशीलता येणार असून, नागरिकाभिमुख प्रशासनाला अधिक बळ मिळणार आहे.

समाज विकास विभागाच्या वतीने बनविण्यात आलेल्या या वेबपेजमुळे महिलांपासून दिव्यांगांपर्यंत सर्व स्तरांतील लाभार्थ्यांना योजनांविषयी माहिती मिळवणे आणि त्याचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. घरबसल्या अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणे हे नागरिकांसाठी मोठे पाऊल आहे.

-ममता शिंदे, उप आयुक्त , समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!