शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आणि जागतिक आहिंसा दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल मार्फत ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’चे आयाेजन करण्यात आले. गांधी जयंती दिनाच्या दिवशी खंडाेजीबाबा चाैक (डेक्कन) ते गांधी भवन (काेथरुड) यादरम्यान ढाेल-ताशाच्या वादनात जंगी रॅली काढण्यात आली. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी,गांधी प्रेमी नागरिक, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते माेठया संख्येने सहभागी झाले होते.
‘महात्मा गांधी की जय’, ‘गोली नही बोली चाहिए’, ‘भारत जाेडाे, भारत जाेडाे..नफरत छाेडाे’ , ‘भारत माता की जय’ घाेषणा उपस्थितांनी देत रॅली मार्गावरील वातावरण गांधीमय केले. रॅलीच्या समाेर एक लहान मुलगा व ज्येष्ठ नागरिक यांनी गांधीची वेशभूषा परिधान करुन हातात काठी घेऊन सर्वांपुढे चालत मार्गस्थ हाेत रॅलीचे नेतृत्व केले. श्रीमंत गर्जना या ढाेल ताशा पथकाच्या वादनाने रॅली मध्ये रंगत आली. रस्त्याने रॅली जाताना अनेक नागरिक थांबून रॅलीकडे उत्सुकतेने पाहत महात्मा गांधीची आठवण जागृत करत हाेते. भारती विद्यापीठ महाविद्यालय, जाधवर संस्था, जेएसपीएम काॅलेज, शाहू काॅलेजसह माहेर या सामाजिक संस्थेचे ६०० ते ७०० विद्यार्थी माेठया संख्येने रॅलीत सहभागी झाले. सकाळी दहा वाजता सुरु झालेली रॅली उत्साहात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गांधी भवन याठिकाणी पाेहचली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी रॅलीचा समाराेप प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधीची विचारसणीचा, त्यांच्या चारित्र्याचा काळावर प्रभाव कसा हाेता, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यांचे विचार हे वैश्विक चिरकालीन असून त्यांच्या विचारांचे स्मरण करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात शांतता नांदावी असा आग्रह धरणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असेल तरच समाजात शांतता नांदते. पुणे शहर कायम दंगामुक्त रहावे आणि सर्वसमाजाने गुण्यागाेविंदाने रहावे काेणताही जातीधर्म वाद उदभवू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी प्रसाद भोजन ठेवण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, ॲड. अभय छाजेड, प्रा.एम.एस.जाधव, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र युकांदचे संघटक अप्पा अनारसे, पुणे शहर युक्रांद कार्यवाह ॲड.स्वप्नील ताेंडे, तेजस भालेराव, रविंद्र धनक, ॲड.गाेपाळ गुणाले, ॲड.राजेश ताेंडे, राेहन गायकवाड, नितीन चव्हाण यांच्यासह संयाेजन समितीचे पदाधिकारी उपस्थित हाेते.