शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे : भारतीय नौदलात वरिष्ठ माध्यमिक भरती (वैद्यकीय) अंतर्गत वैद्यकीय शाखेत नाविक म्हणून नाव नोंदणीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांना https://www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर १० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय नौदल प्रवेश परीक्षा २०२५ साठी वरिष्ठ माध्यमिक भरती (वैद्यकीय) च्या ०२/२०२५, ०१/२०२६ आणि ०२/२०२६ बॅचसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवार हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळांकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह एकूण ५० टक्के आणि प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या बारावी परीक्षेत बसणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे येथे संपर्क साधावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.