spot_img
spot_img
spot_img

ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे आधारस्तंभ, त्यांच्या अनुभव सर्वांसाठी प्रेरणादायी – उप आयुक्त ममता शिंदे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि जीवनमूल्यांचा वारसा आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतो. आजच्या पिढीने त्यांच्याकडून जीवनातील शिस्त, संयम, संघर्षाची ताकद आणि सकारात्मकतेचा वारसा घ्यावा, हीच खरी कृतज्ञता ठरेल. महापालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतात. ज्येष्ठांचा सन्मान हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून, तो आपल्या दैनंदिन आचरणाचा भाग असायला हवा. त्यांच्या आशिर्वादानेच समाज अधिक बळकट होतो, त्यांच्या आनंदी आणि निरोगी जीवनासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापालिका समाज विकास विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे यांनी केले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उप आयुक्त ममता शिंदे बोलत होत्या.

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसदस्य उषा मुंढे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पोलीस अधीक्षक कार्यालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षाचे पोलीस निरीक्षक दिनकर गावडे, पिंपरी चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, सहाय्यक समाज विकास अधिकारी संतोषी चोरगे, समाजसेवक अनिकेत सातपुते, रेश्मा पाटील, विशाल शेडगे, मनोज मरगडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माजी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, शहराच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे मोलाचे योगदान आहे. त्याचीच परतफेड म्हणून महापालिका ज्येष्ठ नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देते. ज्येष्ठ नागरिक भवन उभारणीस परवानगी देणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशात पहिली आहे.

ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ म्हणाल्या की, शहरात १६३ ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. पालिकेच्या वतीने दरवर्षी संघांना विविध भेटवस्तू दिल्या जातात. यावर्षी देखील १४३ संघांसाठी समई आणि खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या अशा सहकार्यामुळे ज्येष्ठांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त तथा शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज विकास विभागामार्फत दरवर्षी १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. यावर्षी पिंपरी चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या २७ पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘आनंद मेळावा’ या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात ज्येष्ठांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्यविषयक तज्ञांचे व्याख्यान आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. आरोग्य फाउंडेशनचे श्रीकांत आपटे यांनी “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानांतर्गत अवयवदान विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप ममता शिंदे यांनी तर सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्रीकांत आपटे अवयवदानाविषयी जनजागृती करतात. केवळ चार महिन्यांत त्यांनी २२ नेत्रदान घडवून आणून ४४ अंधांना दृष्टी प्रदान केली आहे. कार्यक्रमात त्यांनी उपस्थित ज्येष्ठांना अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगत पुढील शपथही दिली “ निधनानंतर माझे सर्व चांगले व बहुमोल अवयव देशाच्या पुढील पिढीसाठी दान करण्याची मी प्रतिज्ञा करतो. हा निर्णय मी माझ्या नातेवाईकांना समजावून सांगेन, म्हणजे योग्य वेळी ते आनंदाने संमती देतील.”

नुकताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानात देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. भविष्यात प्रथम स्थान मिळवण्यासाठी शहरातील नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. यासाठी आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवत आहे. नागरिकांना आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना स्वच्छतेची शपथ दिली जाते. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठांना स्वच्छतेची शपथ दिली.

स्वच्छतेची शपथ :-

“आम्ही शपथ घेतो की, आम्ही स्वतः स्वच्छतेच्या प्रति जागरूक राहीन आणि त्यासाठी वेळही देऊ,दरवर्षी १०० तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करू. आम्ही स्वतः घाण करणार नाही, आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्वप्रथम आम्ही स्वतःपासून, आमच्या कुटुंबापासून, आमच्या गल्ली/वस्तीपासून आमच्या गावापासून तसेच आमच्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करीन. आम्हाला हे मान्य आहे की, जगामधील जे देश स्वच्छ आहेत, त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व घाण करू देत नाहीत. या विचारांनी आम्ही गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करीन. आम्ही आज शपथ घेत आहे, ती आणखी १०० लोकांकडूनही करवून घेईन, ते पण माझ्यासारखे स्वच्छतेसाठी १०० तास देतील यासाठी मी प्रयत्न करीन. आमच्याजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माहिती आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करील” अशी शपथ आज उपस्थितांनी घेतली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!