शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यात सफाई सेवकांचा मोलाचा वाटा आहे. ते शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार असून त्यांच्या आरोग्य व सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्राधान्य देत असते. याच हेतूने आज ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा – २०२५’ पंधरवड्यांतर्गत महापालिकेकडून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली स्वच्छता सेवकांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून थेरगाव येथील स्व. शंकरराव गावडे कामगार भवन येथे ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे पुढे म्हणाले, सफाई मित्रांच्या कल्याणासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. त्यांच्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ सफाई सेवकांना मिळावा, यासाठी सातत्याने महापालिकेकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. याशिवाय सफाई सेवकांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, यावर देखील भर दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपायुक्त सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, थेरगाव रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. लक्ष्मीकांत अत्रे, डॉ. संजय सोनेकर, डॉ. शंकर मोसलगी यांच्यासह महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे, शांताराम माने, राजू साबळे, कुंडलिक दरवडे, महेश आढाव आदी उपस्थित होते.
शिबिरामध्ये नवीन थेरगाव, तालेरा, आकुर्डी, सांगवी, जिजामाता, यमुनानगर, भोसरी व वायसीएम रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सफाई सेवकांची तपासणी केली. यामध्ये रक्त तपासणी, ॲनिमिया, हिमोग्लोबिन, हृदयविकार, मधुमेह, कॅल्शियम, हायपरटेन्शन आदींची तपासणी करून मोफत औषध वितरण करण्यात आले. शिबिरात तब्बल २ हजारांहून अधिक सफाई सेवकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सफाई सेवकांना नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सचिन पवार यांनी करताना सांगितले की, सफाई सेवक हा शहराचा कणा आहे. त्यांचे आरोग्य सक्षम ठेवणे ही महापालिकेची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांनी आभार मानले.
विविध योजनांची माहिती
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने सफाई सेवकांना विविध योजनांचा लाभ व्हावा तसेच त्यांना याची सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने माहितीपर स्टॉल देखील यावेळी लावण्यात आला होता. त्यामध्ये महिला व बालकल्याण कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना इत्यादी योजनांचा समावेश होता.