spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र–जर्मनी सहकार्यास नवे आयाम मिळतील – अजित पवार

जर्मनीचे वाणिज्यदूत-जनरल यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जर्मनीचे वाणिज्यदूत यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्र–जर्मनी सहकार्याच्या विद्यमान प्रकल्पांचा आढावा घेऊन महाराष्ट्र–बॅडन वुर्टेम्बर्ग भागीदारी, कौशल्य स्थलांतर व व्यावसायिक प्रशिक्षण कराराची प्रगती, तसेच भाषा प्रशिक्षणासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या शिष्टमंडळात जर्मनीचे वाणिज्यदूत ख्रिस्तोफ हॅलियर व जर्मनीचे उपवाणिज्यदूत ख्रिस्तोफ रेंडटॉर्फ यांचा समावेश होता.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येत्या काळात महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जा, शाश्वत गतिशीलता, स्मार्ट सिटी, संशोधन व स्टार्टअप इकोसिस्टीम, उच्च शिक्षण देवाणघेवाण आणि सांस्कृतिक संबंध विस्तार या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र–जर्मनी संयुक्त संचालन समिती स्थापन करणे आवश्यक आहे.

तसेच जर्मन उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करताना भासणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जर्मनीत महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी वाढविणे, तसेच जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतही त्यांनी शिष्टमंडळाचे लक्ष वेधले. या सहकार्यामुळे महाराष्ट्राला प्रगत तंत्रज्ञान, कौशल्य वृद्धी, रोजगार निर्मिती व विदेशी गुंतवणूक लाभेल, तर जर्मनीला विश्वासार्ह भागीदारी व नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!