spot_img
spot_img
spot_img

आस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘‘शस्त्रपूजन सोहळा’’ रद्द !

शबनम न्यूज | प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती शिल्प अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकतीच शंभूसृष्टीला ऐतिहासिक मानवंदना सोहळा संपन्न झाला. त्याची ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. येत्या दि. 2 ऑक्टोबर रोजी भव्य-दिव्य शस्त्रपूजन सोहळ्याचे नियोजन केले होते. मात्र, राज्यातील आस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर सदर सोहळा रद्द केला आहे, अशी माहिती हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश भुजबळ यांनी दिली.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे सुमारे 7.5 एकर क्षेत्रावर ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ चे काम सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन व राज्य शासनाच्या पुढाकाराने आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जागेत ही अभिमानास्पद शंभूसृष्टी आकाराला येत आहे.

गणेश भुजबळ म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे देव-देश अन्‌ धर्मासाठी केलेले बलिदान, तेजस्वी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. जगभरात आपल्या राजाच्या विचारांची जागृती झाली पाहिजे. राष्ट्राप्रति समर्पण भावनेतून काम करणारी तरुण पिढी तयार झाली पाहिजे. यासाठी हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम, मोहीम हाती घेणार आहोत.

शंभूसृष्टी आणि ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ला ऐतिहासिक  मानवंदना सोहळा अत्यंत दिमाखात झाला. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील हिंदू बांधवांनी सोशल मीडियावर या सोहळ्याला दाद दिली. त्यानंतर आम्ही विजया दशमी दसऱ्याच्या निमित्ताने दि. 2 ऑक्टोबर रोजी भव्य शस्त्रपूजन सोहळा आयोजित केला होता. हा सोहळा लक्षवेधी होईल आणि शिव-शंभू विचारांचे सोने लुटले जाईल, असा संकल्प होता. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाने झोडपले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अक्षरश: ओला दुष्काळ पडला आहे. अनेक संसार उद्धस्त झाले असून, शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये शस्त्रपूजन सोहळा रद्द करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे, असेही गणेश भुजबळ यांनी सांगितले.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही शस्त्रपूजन सोहळा यावर्षी अत्यंत साधेपणाने करणार आहोत. पुढील वर्षी शस्त्रपूजन सोहळा शाही थाटात करण्यात येईल. आपल्या बळीराजावर आस्मानी संकट ओढावले आहे. त्यामुळे महापूरग्रस्त 50 गावांतील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी आम्ही लोकसहभागातून  मदतकार्य करणार आहोत.
– गणेश भुजबळ, उपाध्यक्ष, हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!