सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे शहीद भगतसिंह जयंती उत्साहात
शबनम न्यूज | प्रतिनिधी
“राष्ट्रासाठी तरुणपणीच प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंह यांचे जीवन धैर्य, त्याग, समर्पण आणि राष्ट्रभक्तीची ओतपोत भरलेले आहे. युवकांसाठी त्यांचे जीवन प्रेरणेचा स्रोत आहे. सामाजिक कार्यासाठी मलाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाने उद्युक्त केले असून, तरुणांना समाजसेवेची आणि सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे,” अशी भावना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केली.
शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे माजी शहराध्यक्ष व नगरसेवक रवींद्र माळवदकर यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. मानपत्र, सुवर्णपदक व सूर्यदत्त स्कार्फ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्ष स्नेहल नवालखा, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “समाजातील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धेविरुद्ध ठामपणे आवाज उठवणे, गरीब व वंचित घटकांच्या हक्कासाठी सातत्याने लढणे, शिक्षण, संस्कृती व समाजजागृतीच्या माध्यमातून समाजात परिवर्तनाची मशाल पेटवणे, अशी माळवदकर यांची कार्यशैली आहे. शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून गरीब व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हजारो कुटुंबांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे ठरले आहेत. गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक व्यासपीठाचा वापर सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी करून त्यांनी समाजक्रांतीची दिशा दाखवली आहे. शहीद भगतसिंह यांच्या आदर्शावर चालत त्यांनी मानवतेचे उच्च मूल्य जपले असून, समाजपरिवर्तनासाठी दाखवलेली त्यांची निष्ठा व कार्याचा ठसा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”
सन्मान स्वीकारताना रवींद्र माळवदकर म्हणाले, “शहीद भगतसिंह यांच्या त्याग, धैर्य आणि प्रामाणिकतेच्या प्रेरणेनेच समाजासाठी कार्य करत आलो आहे. सूर्यदत्तने केलेला हा सन्मान माझ्या कार्याचा गौरव असून, ‘सूर्यदत्त’ परिवाराचे आभार मानतो. डॉ. संजय चोरडिया यांच्या दूरदृष्टीतून सूर्यदत्तचे विद्यार्थी उत्तम रीतीने घडत आहेत. शिक्षणाबरोबरच शहीद भगतसिंह यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या शिकवणीचे मूल्य अंगीकारून पुढे जावे, म्हणजेच व्यक्तिगत प्रगतीसोबत समाजाची प्रगतीही साध्य होईल.” सुषमा चोरडिया यांनी शहीद भगतसिंह यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल नवालखा यांनी आभार मानले.
“शहीद भगतसिंह यांनी दिलेली शिकवण आजही प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनासाठी मार्गदर्शक आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा सन्मान करत, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने समाजाचे व देशाचे नेतृत्व करण्याची तयारी ठेवली पाहिजे.”
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन