spot_img
spot_img
spot_img

पर्यटन, चित्रपटसृष्टीच्या समन्वयातून मोठ्या संधी उपलब्ध

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चित्रपटांमधून दाखवलेली स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. स्थानिक संस्कृती, परंपरा व नैसर्गिक सौंदर्य यांचा जागतिक पातळीवर प्रसार करण्यासाठी चित्रपट हे महत्त्वाचे साधन ठरू शकते. त्यामुळे चित्रपटसृष्टी आणि पर्यटन या दोन क्षेत्रांचा परस्परांशी चांगला समन्वय झाला, तर जागतिक पातळीवर मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा सूर चौथ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात उमटला. पर्यटन क्षेत्राच्या प्रचारासाठी लघुपट हे प्रभावी माध्यम असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.

 

जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ आणि धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय महोत्सवात तज्ज्ञांनी विविध चर्चासत्रांत विचार मांडले. पानशेत धरण परिसरातील सूर्यशिबिर रिसॉर्टमध्ये या दोन दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लघुपट, माहितीपटांचे स्क्रीनिंग, पर्यटन व चित्रपटांसंबंधी विषयांवर चर्चासत्रे, जंगल सफारी, सांस्कृतिक सांगीतिक कार्यक्रम झाले.

 

अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची शाही मिरवणूक, शिवकालीन शस्त्रात्रांचे प्रात्यक्षिक व ऐतिहासिक मर्दानी खेळांचे सादरीकरण करत महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रसंगी आमदार शंकर मांडेकर, अभिनेत्री स्मिता तांबे, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, माजी सनदी अधिकारी अर्जुन म्हसे पाटील, संयोजन समिती प्रमुख अजित शांताराम, ज्युरी सदस्य डॉ. संतोष पाठारे आदी उपस्थित होते.

 

‘मोलाई: मॅन बिहाइंड द फॉरेस्ट’ या माहितीपटाने, तर ‘शरावथी सांगथ्या’ लघुपटाने महोत्सवाचे विजेतेपद पटकविले. माहितीपट विभागात ‘गुडवी: मायग्रेटरी बर्ड्स नेस्ट’ने, तर लघुपट विभागात ‘मिनी बँक’ने द्वितीय क्रमांक मिळवला. धीरज कश्यप (मोलाई) व याजी (शरावथी सांगथ्या) यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. ‘दशावतारी ऑफ कोकण’ला विशेष पारितोषिक देण्यात आले. स्पेशल ज्युरी अवॉर्डने डिव्हाईन कलर्स ऑफ फेथ व झालना या लघुपटांना सन्मानित करण्यात आले.

 

‘पानशेतमधील महोत्सवाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिणाम’, तसेच ‘पानशेतमधील निसर्ग, इतिहास आणि पर्यटनातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर परिसंवाद झाले. स्थानिक पर्यटन, रिसॉर्ट मालक, टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मेळाव्यातून विचारांचे व संधींचे आदानप्रदान झाले. ‘पानशेतमधील निसर्ग, इतिहास, भूगोल आणि पर्यटनातील उलगडा’ यावर श्रमिक गोजमगुंडे आणि महेश धिंडले यांची प्रकट मुलाखत झाली.

 

‘महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे व चित्रपटाचे चित्रीकरण’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात कलादिग्दर्शक सुमित पाटील, हॉस्पिटॅलिटी मार्केटिंग तज्ज्ञ अमेय भाटे, गोल्डन ट्रेल्सचे प्रमुख निलेश धामिस्टे, निसर्गशाळाचे संस्थापक हेमंत वाव्हळे, मुळशी टूर्सचे हनुमंत चोंधे यांनी विचार मांडले. यावेळी पुण्यातील टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

 

समारोपावेळी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गिरीसागर टूर्सच्या संचालिका वीणा गोखले यांना जीवनगौरव, तर गेट सेट गो हॉलिडेजचे संचालक अमित कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसंगी अभिनेता विठ्ठल काळे, अभिनेत्री वैशाली केंदळे, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजचे अध्यक्ष जीवराज चोले, संयोजक गणेश चप्पलवार आदी उपस्थित होते.

गणेश चप्पलवार म्हणाले, “यंदा चौथ्या महोत्सवात आलेल्या ६१ पैकी १७ निवडक लघुपट व माहितीपटांचे स्क्रीनिंग झाले. शालेय जीवनातच पर्यटनाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने निबंध स्पर्धेचेही आयोजन केले होते. ३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. तसेच १८ पेक्षा अधिक प्रवासवर्णने आली होती.”

आरजे तेजू यांनी सूत्रसंचालन केले. असीम त्रिभुवन यांनी आभार मानले. डॉ. राजीव घोडे, अश्विनी वाघ, महेश गोरे, अजित शांताराम, साहिल भोसले, सारंग मोकाटे यांनी महोत्सवाच्या आयोजनात परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!