spot_img
spot_img
spot_img

“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा ५०,००० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंत चालणार मोफत आरोग्य शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशभर राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये १७ सप्टेंबर २०२५ रोजी हे अभियान सुरू झाले असून आतापर्यंत राबविण्यात आलेल्या या शिबिरामध्ये ५० हजाराहून अधिक महिला व बालकांनी विविध तपासण्या व उपचारांचा लाभ घेतला आहे.

सदर शिबिरांतर्गत महिलांसाठी, किशोरींसाठी व बालकांसाठी विविध आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग व ॲनिमिया तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, पोषणविषयक समुपदेशन व लसीकरण यांचा समावेश आहे. तसेच किशोरींसाठी मासिक पाळी व पोषणविषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय आयुष्मान भारत डिजिटल मिशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्मान वय वंदना कार्ड यांचे वितरण, निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी व क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दत्तक घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार रुग्णांना रक्त, लघवी, सोनोग्राफी, एक्स-रे आदी तपासण्यांसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या अधिपत्याखाली हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे तसेच सर्व रुग्णालयप्रमुख यांनी या अभियानाची अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये या अभियानांतर्गत २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून जास्तीतजास्त महिलांनी व किशोरींनी आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत करण्यात आले आहे.

महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते. या मोहिमेद्वारे आरोग्यविषयक तपासण्या आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे. तरी जास्तीतजास्त महिलांनी या वैद्यकीय शिबिरांचा लाभ घ्यावा.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियानांतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या शिबिरांमुळे महिलांच्या नियमित वैद्यकीय तपासणीसह त्यांना पोषण आणि आरोग्यविषयक माहिती मिळत आहे. या शिबिरांमध्ये एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या, मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून दिले आहेत.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

मोफत आरोग्य शिबिरांमध्ये किशोरी, गर्भवती महिला व लहान बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ही शिबिरे दररोज सुरू राहतील. त्यादृष्टिने नियोजन करण्यात आले आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!