शबनम न्यूज | प्रतिनिधी
महात्मा गांधी यांचा विचार विश्वाची सुख_शांती आनंद,मानवता, माणुसकी यांचे प्रतीक होते. जगभरात विविध मान्यवरांनी त्यांचे नेतृत्वास मान्यता दिली. मात्र, भारतात वेगळी परिस्थिती आजकाल दिसून येत आहे. अध्यात्म,अहिंसा, सत्य या विचारांवर त्यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात प्रखर लढा दिला, त्यामुळे भारताचा इतिहास गांधीं शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचे चारित्र्य व चिंतन देशाशी एकरूप झालेले होते,त्यामुळे ते भाजपसह कोणीही तोडू शकत नाही. “महात्मा” पद उगीच कोणाला प्राप्त होत नसते. गांधीतील “महात्मा” जिवंत असून त्याला उजाळा देणे महत्त्वाचे आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी व्यक्त केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांचे जीवनचरित्र मांडणाऱ्या फोटो प्रदर्शनचे उद्घाटन सारसबाग जवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन याठिकाणी श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे,संजय बालगुडे,अभय छाजेड,सुनील शिंदे,विठ्ठल गायकवाड, नीता परदेशी, डॉ. विवेक शर्मा, अक्षय जैन उपस्थित होते.
सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमा दरम्यान सबनीस म्हणाले, अभय छाजेड आणि उल्हास पवार यांच्या निष्ठाकडे पाहून मला त्यांचा आदर वाटतो. आपली निष्ठा हीच आपल्या जीवनाच्या चारित्र्याला अर्थ देत असते. अभय छाजेड कायम गांधीवादी आणि काँग्रेस विचारांचे अनुयायी राहिलेले आहेत. महात्मा गांधी यांची शिकवण आजचे विद्वान, राजकारणी, कार्यकर्ते विसरत चालले असल्याचे दिसत आहे. मात्र,मागील 25 वर्षापेक्षा अधिक काळ गांधी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन भरवणे हे निष्ठेचे प्रतिक आहे. महात्मा गांधी यांनी बॅरिस्टर होऊन सुद्धा सर्वसामान्यांमध्ये सहजरित्या मिसळत अहिंसा व असहकार याचे महत्व सामान्यांना प्रतिकूल परिस्थितीत पटवून दिले. राजकारणात सध्या स्वार्थ, धर्म आणि जातीयवाद वाढलेला दिसत असून राजकारण म्हणजे व्यभिचार, गचाळ असे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे. गांधी केवळ तोंडाच्या चवीपुरते मर्यादित नको असून त्यांचा विचार स्वदेशी, स्वधर्म आणि सर्वसमावेशक याप्रती अधिक होता हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण आहे. गांधीतील महात्मा आजही जिवंत आहे कारण, त्यांचे हिंदुत्व उदारमतवादी होते. इतरांशी मतभेद असूनही त्यांनी व्यापक विचार करून भारतीय संस्कृतीचे पालन केले. नथुराम गोडसे या मारेकऱ्याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली मात्र, आज काही मूठभर लोक त्याला देशभक्त ठरवत आहेत. अशाप्रकारचा ग्रुप हा विखारी विचारधारेचा असून ते देशाचे आणि मानवतेचे गुन्हेगार आहेत. जगाचे आदर्श मॉडेल म्हणून महात्मा गांधी यांच्याकडे पाहिले जाते. सत्ता हे सेवेचे साधन आहे हे सिद्ध करणारे त्यांचे नेतृत्व होते. अस्पृश्यता, जातीभेद यांना त्यांनी कुठेही थारा दिला नाही. गांधींचे नाव घेण्याची आवश्यकता आज देखील निर्माण होत आहे यातच त्यांची महती आहे.
उल्हास पवार म्हणाले, महात्मा गांधींचे विचारांची त्याकाळी लोकांनी टिंगलटवाळी केली. मात्र, 1945 साली जपान मधील हिरोशिमा व नागासाकी येथे अणुबॉम्ब हल्ला झाला आणि हिंसेचा अनर्थ ज्यांना कळला नाही त्यांना हिंसेचा अर्थ समजला गेला. लालबहादूर शास्त्री हे देखील महात्मा गांधींचे अनुयायी होते. गांधींचे विचार त्यांनी प्रत्यक्षात आत्मसात केलेले दिसून येत आहे. आज अशाचप्रकारे कृतीशील नेतृत्वाची गरज भासत आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते वांगचुक सनदशीर मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, सत्ताधारी यांनी त्यांना अटक केली हा निंदनीय प्रकार आहे.
अभय छाजेड म्हणाले,आजचा काळ महात्मा गांधी यांचे विचार अनुकरण करण्याचा आहे. मात्र, दुर्दैवाने प्रतिगामी शक्ती त्यांचे विचार मारून नथुराम गोडसेचे विचार पुढे नेत आहे. आज जगभरात महात्मा गांधी यांच्या विचाराचे महत्व पोहोचवण्याची गरज आहे.त्याकाळात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे हिंसाचार मोठ्या प्रमाणात असताना देखील, गांधी यांनी अहिंसेचा विचार लोकांसमोर मांडून त्यामाध्यमातून त्यांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला ही बाब अवघड गोष्ट होती. तेव्हाची आणि आजची परिस्थिती पुन्हा सारखी झालेली आहे. सत्ताधारी हे गांधींचे विचार मारण्यात धन्यता मानतात मात्र, सर्वांनी मिळून गांधीजींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वपूर्ण आहे.