शबनम न्यूज | प्रतिनिधी
कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह कोकण विभागातील जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे तसेच मनुष्य व पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्याने दक्ष राहण्याचे निर्देश दिले.
यावेळी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पालघर जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी या महानगरपालिकांचे आयुक्त दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई-विरार या महानगरपालिकांच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाची माहिती घेतली. यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असला तरी सरासरी ८० ते १०० मिमी पाऊस पडल्याने सर्वांनी सांगितले. ठाणे, पालघर, रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी धोकादायक पातळीपेक्षा खाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बदलापूरमध्ये काल एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना वगळता कुठेही जीवितहानी अथवा पशुधन हानी झाल्याची घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले. पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही रात्रीपर्यंत रेड अलर्ट दिला असल्याने प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.