शबनम न्यूज | प्रतिनिधी
वयोगट ३ ते १२ वर्षांमधील १०००हून अधिक कन्या, रंगीबेरंगी ड्रेस, कपाळावर चुनरी, चंद्रकोर, स्तोत्रपठण, लकी ड्रॉ, खाऊवाटप अशा उत्साही वातावरणात शिवदर्शन–सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात ललिता पंचमीनिमित्त पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आज कन्यापूजन कार्यक्रम संपन्न झाला. प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सहभागी सर्व लहान मुलींच्या कपाळावर चुनरी, चंद्रकोर आणि कुमकुम तिलक पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी लावले. या सर्व लहान कन्यांचे पाय धुऊन त्यावर स्वस्तिक चिन्ह काढण्यात आले. त्यानंतर औक्षण करून गजरे देण्यात आले. तसेच सामूहिक आरती करण्यात आली.
यावेळी बालगीते व नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी या मुलींनी नऊवारी साडी, घागरा, पंजाबी ड्रेस असे रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते. याशिवाय कालिका देवी, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, अर्धनारी नटेश्वर, कमळातील देवी अशी रूपे वेशभूषेतून साकारली होती. याप्रसंगी अनेक मुलींनी गणपती स्तोत्र, श्रीसूक्तपठण, दुर्गास्तुती तोंडपाठ म्हणून दाखवली आणि उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लकी ड्रॉमधील विजेत्या दुर्वा जाधव, नंदिनी राजपूत, अक्षरा कदम, समृद्धी पवार, आरुषी भारती या मुलींना सायकल, ब्लँकेट, कॅरम इत्यादी बक्षिसे देण्यात आली. तसेच लकी ड्राॅमधील अन्य १० मुलींना स्कूल बॅग्ज व प्रवासी बॅग्ज देण्यात आल्या. सहभागी सर्व मुलींना वॉटरबॅग व खाऊ देण्यात आला.
याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रत्येकीला ‘’तू मोठी झाल्यावर काय होणार ?’’ असे विचारले. यावर अनेकींनी डॉक्टर, पोलीस इन्स्पेक्टर, शास्त्रज्ञ अशी उत्तरे दिली. यावर आबा बागुल म्हणाले की, ‘’मुलींना मोठी स्वप्ने बघू द्यात आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पालकांनी विशेष मेहनत घेतली पाहिजे.’’
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध व सुरक्षेबाबत आवाज उठविण्याचे आवाहन करून म्हटले की, ‘’पालकांनी मुलगी झाली तरी आनंदच मानला पाहिजे. मुलीला खूप शिकवा किंवा विविध कलांमध्ये पारंगत करा. त्याचबरोबर आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र, शेजारी या सर्वांमध्ये स्त्रीभ्रूणहत्येबद्दल व सुरक्षेबद्दल जागरण करा.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बागुल, नूपुर बागुल आणि योगिता निकम यांनी केले. यावेळी डॉ. सौ. रांका, सौ. सुचेता अण्णा थोरात, उद्योगपती सुधीर वाघोलीकर उपस्थित होते.