ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरांजली
शबनम न्यूज | प्रतिनिधी
बदलत्या काळात महाराष्ट्राची लोककला, नृत्य आणि सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे महत्त्वचे आहे. महाराष्ट्राची संपन्न लोकपरंपरा, लोककला त्याच्या मूळ स्वरूपात सादर करण्यासाठी आणि याबाबतचा प्रसार करून लोकांना त्याच्याशी जोडण्यासाठी ‘अस्मिता महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक समूहाची स्थापना करण्यात आली, असे मत निर्माते पृथ्वीराज नागवडे यांनी व्यक्त केले. ३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात ‘अस्मिता महाराष्ट्राची’ कार्यक्रम सदर झाला. त्यावेळी ते बोलत होते. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून या महोत्सवाचे आधारस्तंभ बनलेले ‘राष्ट्रपती पुरस्कारा’ने सन्मानित ज्येष्ठ लोककलावंत कै. केशवराव बडगे यांचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याची भावना आबा बागुल यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमात प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ गायिका पद्यश्री माणिक वर्मा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल, निर्माते पृथ्वीराज नागवडे आणि सर्व कलाकारांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच गायिका माणिक वर्मा यांनी गायलेले प्रसिद्ध ‘अमृताहूनि गोड..’ हे भावगीत गाऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
राज्यभरातील ५०पेक्षा अधिक नवोदित कलाकार मेहनतीने आणि निष्ठेने पारंपरिक लोककला आत्मसात करुन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अस्मिता महाराष्ट्राची’ माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे यावेळी दिसून आले. पुरुष कलाकारांनी सदरा, धोतर आणि फेटा, तर महिला कलाकारांनी नऊवारी साडी नेसून हातात भगवा झेंडा फडकवीत जल्लोषपूर्ण पद्धतीने विठुरायाची पालखी थेट प्रेक्षकांमधून घेऊन येत कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात केली.
भारुड, गोंधळ, पोतराज, जोगवा, वासुदेव, बतावणी, वाघ्या-मुरळी या लोकनाटय आणि पारंपरिक कलाप्रकारांच्या सादरीकरणातून रसिकांना दुर्मिळ होत चाललेल्या ग्रामीण परंपरांची पुनर्आठवण कलाकारांकडून करून देण्यात आली. पारंपरिक ग्रामीण संस्कृती शहरातील लोकांना पुन्हा माहीत व्हावी, असा प्रयत्न याद्वारे करण्यात आला.
संगीत व नृत्यशैलीच्या माध्यमातून लावणी, कोळीनृत्य, मंगळागौर, ढोल-ताशा-लेझीम, गवळण, अंगाई गीत, शंकासुर, काठोळी आदी प्रकार सादर करण्यात आले. कोणत्याही आधुनिक फ्युजनशिवाय आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरांची महती गण, अभंग, वारी, धनगरी गजा, तुंबडी, भल्लरी, नंदीबैल सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आली. प्रशांत मखरे यांनी अभ्यासपूर्ण आणि सहजरीत्या सर्वांना भावेल अशा भाषाशैलीत सूत्रसंचालन करीत कार्यक्रमात रंगत आणली. पुणे नवरात्रौ महोत्सवातील “अस्मिता महाराष्ट्राची” कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी कलाकारांना विविध लोकपरंपरा सादर करताना सिद्धेश उंडाळकर ( पखवाज), कृष्णा अवघडे (ढोलकी, संबळ), साहिल कांबळे (ड्रम), अनिकेत काळोखे, अभिषेक सुरडकर (पियानो) , श्रेया बऱ्हाटे (बासरी), जयेश म्हस्के ( ढोल), आफताब शाह ( हार्मोनियम ), ऋषिकेश उंडाळकर , शुभम मुकीर (साइड ऱ्हिदम) यांनी आपल्या वादनातील कौशल्य दाखवीत साथ दिली. तर, गायनासाठी गायक म्हणून ऋषिकेश आडे, प्रदीप लोंढे, सोपान कामगुणे, सौरव चव्हाण, रोहित शिंदे आणि गायिका सानिका अभंग, श्रद्धा गद्रे, जान्हवी गद्रे, पायल वारुंगसे, रुचिता शिरसाठ, जान्हवी खडपकर यांनी सहाय्य केले.
याप्रसंगी जयश्री बागुल, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, हर्षदा बागुल, सागर बागुल उपस्थित होते.