शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचे प्रतीक.देवीच्या नऊ रुपांची उपासना करताना समाजात कार्यरत असलेल्या खऱ्या ‘नवदुर्गा’चा गौरव करणे आवश्यक ठरते.अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे शामला रामचंद्र पंडित (दीक्षित). पर्यवेक्षिका , कवयित्री,सामाजिक कार्यकर्त्या , आर्दश शिक्षिका , प्रकाशिका अशा अनेक भूमिका समर्थपणे पार पाडत त्या खऱ्या अर्थाने अष्टपैलू ठरतात.
१९९२ पासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाळांमध्ये अध्यापन करताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले.निमगावकेतकी, कापूरहोळ,नसरापूर,कामशेत, चऱ्होली,मोशी,आकुर्डी अशा शाखांमधून अध्यापन करत अखेर श्री.म्हाळसाकांत विद्यालय,आकुर्डी येथे त्यांचे कार्यस्थळ निश्चित झाले. विद्यार्थ्यांमध्ये १०० टक्के निकाल परंपरा निर्माण करत त्यांनी मराठी विषयाची गोडी लावली,तर सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.
यासोबतच त्यांची साहित्ययात्रा अधिकच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ८ मार्च २०१६ रोजी महिलादिनी लिहिलेल्या पहिल्या कवितेपासून आजपर्यंत त्यांनी अमृतकुंभ, स्वर्गफुल,काव्यधारा,शब्दांकुर, दरवळ,झुळूक,अष्टपैलू, स्वानंद,शब्दझुला,शामलाक्षरी, पुष्पांजली , फलोक्ती असे तेरा कवितासंग्रह,प्रेमाचा जिव्हाळा, भावतरंग,शब्दकमले असे चारोळी संग्रह,तसेच भावदर्पण हा कथासंग्रह प्रकाशित केला. त्यांच्या अष्टाक्षरी काव्यरचनांचे पुस्तक प्रख्यात संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रस्तावनेसह प्रकाशित झाले,तर सुप्रसिद्ध लेखक,खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या शुभेच्छा लाभल्या.
त्यांनी “शामलाक्षरी” हा नवा काव्यप्रकार निर्माण केला.समान शब्दांचे वेगवेगळे अर्थ वापरून केलेल्या या काव्यनिर्मितीला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.समलक्षरी काव्यप्रकाराचे पाच प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत . आजवरच्या त्यांच्या रचनांमुळे साहित्यविश्वात त्यांना वेगळे स्थान मिळाले आहे.
साहित्य व शिक्षण क्षेत्रातील कार्याबरोबरच समाजसेवेतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. महिला बचत गटांचे मार्गदर्शन, भजनी मंडळ,सूत्रसंचालन, सामाजिक उपक्रम यातून त्यांनी कार्यक्षेत्र विस्तारले.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पिंपरी चिंचवड आदर्श शिक्षिका पुरस्कार, पिडीइए पतसंस्था आदर्श शिक्षिका पुरस्कार , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार,साहित्यरत्न पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार,छावा काव्य पुरस्कार यांसह असंख्य सन्मान प्राप्त झाले आहेत.
नवरात्रात देवीच्या विविध रुपांचे स्मरण करताना शामला पंडित यांचा बहुआयामी प्रवास स्त्रीशक्तीच्या तेजस्वी दर्शनासारखाच वाटतो. अध्यापन,लेखन,संस्कृती आणि समाजसेवा या सर्व क्षेत्रांत त्यांनी दाखवलेला बहुमूल्य ठसा म्हणजेच आधुनिक काळातील साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील नवदुर्गा.