विशेष लेख : स्नेहा सोमाणी
आमचे मंडळ गेली नऊ वर्षे श्रीविहारमध्ये कार्यरत आहे. पण याची कल्पना सुचली ती स्नेहा, वृशाली आणि गौरी या तीन मैत्रिणींना. एकदा सहज गणपती मंदिरात असताना आमच्या मनात विचार आला की नवरात्र जवळ येत आहे. आपण आपल्या सोसायटीत श्रीसूक्त पठण करू या का? इतरांनाही विचारू या, आणि जर सर्वांची संमती असेल तर आपण या उपक्रमाला सुरुवात करू या.
ही संकल्पना आम्ही आमच्या सोसायटीतील देशपांडे काकू, ढोले काकू, आशा काकू, सायली धारप आणि पोरेड्डी काकू यांच्यासमोर मांडली. सर्वांनी आनंदाने परवानगी दिली आणि आमच्या या श्रीसूक्त पठणाच्या कार्यक्रमाला दणक्यात सुरुवात झाली.
मंडळाच्या माध्यमातून आम्ही भगिनी नवरात्रोत्सवातील नऊ दिवस, मंडळातील काही सभासदांच्या घरी जाऊन, आळीपाळीने रोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत श्रीसूक्त पठण करतो. आमचे वैशिष्ट्य असे की आम्ही केवळ श्रीसूक्तच नव्हे तर गणपती स्तवन, कुंकूमार्चन, देवीचा जप, महालक्ष्मी अष्टक, देवीची गाणी, गोंधळ, जोगवा, दृष्ट आणि प्रार्थना देखील सादर करतो.
मंडळातील सर्व भगिनी उत्साही असल्यामुळे कार्यक्रम नेहमीच जोशात व चांगल्या वातावरणात पार पडतो. सर्वांमधील सामंजस्य आणि सहकार्याची भावना यामुळे कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याशिवाय नियोजनबद्ध रीतीने होतो.
या उपक्रमामुळे आमच्या भगिनींमध्ये ऐक्य, विश्वास आणि परस्परांबद्दलची जिव्हाळ्याची भावना अधिक दृढ झाली आहे. नवरात्रीतला एक दिवस आम्ही भोंडला देखील एकत्र येऊन, अगदी दणक्यात आणि आनंदात साजरा करतो.
आई जगदंबा आम्हाला पुढेही अशीच सेवा करण्याची बुद्धी, प्रेरणा आणि शक्ती देवो, हीच तिच्या चरणी आमची सामूहिक प्रार्थना आहे.