महापालिकेकडे अर्ज दाखल करून दुरुस्तीची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोशी परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून खड्डेमय रस्त्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देहू-आळंदी मार्गावरील डी-मार्ट ते भारतमाता चौक या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षवेधी ठरली असून, यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार, महिला व ज्येष्ठ नागरिकांना दररोज त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष आतिश बारणे यांनी महापालिका प्रशासनाकडे थेट अर्ज दाखल करून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या तक्रारींसोबतच माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांनंतर त्यांनी ही कारवाई केली.
बारणे म्हणाले की, “रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात पाणी साचल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून, अपघाताचा धोका दुप्पट झाला आहे. या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षितता मिळावी ही माझी स्पष्ट भूमिका आहे. प्रशासनाने तातडीने काम हाती घ्यावे, यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहे.”
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मोशी परिसरातील रहदारीचा मोठा भार उचलणारा हा मार्ग असल्याने दुरुस्तीचे काम तातडीने झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नागरिकांच्या समस्यांसाठी तत्परतेने उभे राहून ठोस भूमिका घेणे, हे आतिश बारणे यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य असल्याचे स्थानिकांनी नमूद केले. आगामी काळात नागरिकांच्या सर्व प्रश्नांसाठी ते याचप्रमाणे आवाज उठवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.