“इश्क सुफियाना”च्या माध्यमातून सुफी संगीताची आराधना
शबनम न्यूज | प्रतिनिधी
बंगाली, हिंदी आणि मल्याळयम चित्रपटांना दर्जेदार संगीत देणारे दिवंगत संगीतकार सलील चाैधरी यांची कारकीर्द दिशादर्शक होती. बहुभाषात चित्रपटांना संगीत देणाऱ्या चौधरी यांनी विविध १३ भाषेत संगीत निर्मिती केल्याने त्यांचे चाहते देशभरात दिसून येतात. संगीता साेबतच ते बासरी, पियानो या संगीत वादनात देखील पारंगत होते. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज संगीतकार यांना करिअरच्या सुरवातीच्या काळात संगीताचे प्रशिक्षण देण्यात त्यांचा पुढाकार होता. १५० पेक्षा अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे संगीत अजरामर झाले असून त्यांच्या कारकीर्दीला जन्मशताब्दी निमित्ताने उजाळा देणे महत्वपूर्ण असल्याचे मत पुणे नवरात्रौ महोत्सवाचे प्रमुख आबा बागुल यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संगीत क्षेत्रात “सलीलदा..” नावाने प्रसिद्ध असलेल्या सलील चौधरी यांचे “सुहाना सफर और ये मौसम हसीन..” हे गाणे गात आदरांजली वाहण्यात आली.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंदिर याठिकाणी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निवेदक संदीप पंचवाटकर निर्मित ‘इश्क सुफियाना’ या सुफी संगीताची आराधना करणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयाेजन पुणे नवरात्रौ महोत्सवाचे वतीने करण्यात आले. नामांकित गायक संदीप उबाळे, प्रवीण अवचार, विनल देशमुख यांच्यासह गायिका राधिका अत्रे यांनी दर्जेदार सुफी गाण्यांचे गायन करत प्रेक्षकांची मने जिंकली. ईश्वराच्या एका नावाचा सातत्याने उच्चार करुन त्याच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न सुफी गाण्यांचे माध्यमातून केला जातो. ईश्वराच्या प्रेमासाठी सुफी संगीत लिखाण केले जाते.मात्र, चित्रपट मध्ये त्यांच्या गोष्टीनुसार ते गरजेप्रमाणे कलाकार यांच्यासाठी वापरले जाते. पवित्र प्रेमाची व्याख्या सुफी गाण्यातून करण्यात येते. स्वत:ला विसरुन स्वत:चे सर्वस्व त्यागून ईश्वाराला प्राप्त करण्याचा प्रयत्न सुफी गायनातून केला जात असल्याची भावना निर्माते संदीप पंचवाटकर यांनी व्यक्त केली. गायिका राधिका आणि गायक विनल यांनी “साजदा तेरा साजदा..” या गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर “सैय्या” .. “मितवा” ..”दगाबाज रे”..” इश्क सुफियाना”…”पिया रे पिया रे”..या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढत नेली. गायक संदीप, प्रवीण आणि विनल यांनी एकत्रित गायन केलेल्या “लगी तुमसे..तेरे मस्त…तेरा दीदार” गाण्यानी कार्यक्रम आणखी सजत गेला. “ख्वाजा मेरे”.. या गाण्यास तर रसिकांनी टाळ्यांची साथ देत, वन्स मोअर..म्हणत कार्यक्रमात उत्साह वाढवला. “वंदेमातरम” गायनाने कार्यक्रमाची जल्लोषात सांगता करण्यात आली.
यावेळी गायकांना विविध गाण्यांना सिंथेसायझर वादनास सईद खान, बासरी- सचिन वाघमारे,बेस गिटार – विजय मूर्ती, ऑक्टोपॅड- असीफ इनामदार, ढोलकी- हर्षद गनबोटे तर तबला वर गोविंद कुडाळकर यांनी सर्मपक साथ दिली.
याप्रसंगी जयश्री बागुल, घनश्याम सावंत ,विलास रत्नपारखी, ॲड.चंद्रशेखर पिंगळे, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, सागर बागुल उपस्थित होते.