शबनम न्यूज | प्रतिनिधी
एखाद्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने काम चालते, याचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा, यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे ‘सूर्यदत्त धन्वंतरी हॉस्पिटल’ या प्रायोगिक रुग्णालय उभारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट व रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी बनून वैद्यकीय सेवेचा अनुभव घेतला. सूर्यदत्त मल्टी डिसीप्लिनरी इंटिग्रेटेड कॅम्पस संकल्पनेंतर्गत हा अभिनव उपक्रम सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात झाला.
‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस हे प्रायोगिक रुग्णालय उभारण्यात आले होते. यामध्ये विविध ओपीडी, आयपीडी, आयसीयू, रेडिओडायग्नोसिस, मेडिकल अशा क्लिनिकल विभागांमधील कामकाज, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे सराव, बेसिक लाईफ सपोर्टची प्रात्यक्षिके, मॉक ड्रिल्स, हॉस्पिटल रेकॉर्ड्स, बिलिंग, डिस्चार्ज समरी, अँब्युलन्स आदी सुविधांचा व प्रशासनिक प्रक्रियांचाही विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. या उपक्रमामध्ये सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंग पॅरामेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्च, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजी तसेच सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम या संस्थांचा सक्रीय सहभाग होता.
सुबोध हॉस्पिटलमधील डॉ. कांतीलाल लोढा, डॉ. सुजय लोढा, कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप मुनोत, शाश्वत हॉस्पिटलच्या सोनल बिडवई, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रतिमा वर्तक, मुख्य परिचारिका उर्मिला शिरसाट, ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ. मीनाक्षी पंडित, रिहॅब अँड अक्वटीक थेरपिस्ट डॉ. गजानन भालेराव, डॉ. सुनील अंबुरे, डॉ. सीमा पाटील, डॉ. स्वरूप पाटील, डॉ. विजय राह्यकर, डॉ. तृप्ती बस्ते, डॉ. पार्थ अभ्यंकर, डॉ. स्वाती देशमुख यांना ‘सूर्यदत्त धन्वंतरी हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांना रुग्ण हाताळणीचा आत्मविश्वास मिळावा, त्यांच्यातील कौशल्य वृद्धिंगत व्हावीत, रुग्णालयीन कामकाज व प्रशासनिक प्रक्रिया यांचे सखोल आकलन व्हावे, यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. ‘सूर्यदत्त धन्वंतरी हॉस्पिटल’ समाजकल्याणासाठी उचलेले एक पाऊल आहे. अत्याधुनिक व बहुविध सुविधा असलेले ‘सूर्यदत्त धन्वंतरी हॉस्पिटल’ लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, अॅलोपॅथी असे सर्वच प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत. या हॉस्पिटलला देशातील नामांकित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांशी टाय-अप असून विद्यार्थ्यांना विविध विभागांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. विद्यार्थ्यांना येत्या एका वर्षात मॉक हॉस्पिटलच्या माध्यमातून व्यवहार्य प्रशिक्षणाचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर साधारण दोन वर्षांत सूर्यदत्त स्वतःचे आधुनिक ‘धन्वंतरी हॉस्पिटल’ उभारून समाजासाठी व विद्यार्थ्यांसाठी नवा अध्याय सुरू करेल.”
सूर्यदत्त संस्थेच्या कॅम्पसला बहुविध शैक्षणिक शाखांचा अनोखा संगम लाभला आहे. २०२१ मध्ये फिजिओथेरपी, त्यानंतर फार्मसी व मागील वर्षी नर्सिंग विभागाची स्थापना करण्यात आली. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट, क्रीडा, काउन्सेलिंग, अल्टरनेट मेडिसिन, ऑर्गॅनिक एन्व्हायरमेंट व समाजसेवा अशा विविध विभागांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. विद्यार्थ्यांना एनजीओ व्हिजिट, ऑन-जॉब ट्रेनिंग यांचा लाभ मिळतो. एक वर्ष मॉक हॉस्पिटलचा अनुभव देऊन पुढील दोन वर्षांत सूर्यदत्ता स्वतःचे अद्ययावत हॉस्पिटल सुरू करणार आहे, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
प्रसन्न पाटील म्हणाले, “समुद्रातून मंथन झाले की रत्न प्रकटतात; त्याचप्रमाणे ‘सूर्यदत्त’मधून सतत नवनवीन शाखा व विभाग जन्म घेत आहेत. या शाखांचा उपयोग भावी पिढी घडवण्यासाठी होत आहे. खरा विकास म्हणजे ‘देवदर्शन’ आणि तो डॉक्टरांच्या माध्यमातूनच साध्य होतो. ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी निष्ठा, परिश्रम आणि नैतिकतेच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग कारकीर्द घडवतील, अशी माझी खात्री आहे.”
डॉ. श्रीधर शिरोडकर यांनी फिजिओथेरपीबद्दल, डॉ. सीमी रेठरेकर यांनी हॉस्पिटल संकल्पनेबद्दल, डॉ. सारिका झांबड यांनी फार्मसीबद्दल तर डॉ. रसिका गुमास्ते यांनी हॉस्पिटॅलिटी विभागाबद्दल आपले विचार मांडले. डॉ. राजकिरण टिकू, डॉ. पल्लवी लेले यांच्यासह इतर सर्वच शाखांमधील विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे यशस्वी संयोजन केले. मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक स्वप्नाली कोगजे आदी उपस्थित होते.