शबनम न्यूज | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान व अनुभव मिळावा, यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये तीन दिवस प्रतीकात्मक ‘सूर्यदत्त धन्वंतरी हॉस्पिटल’ (मॉक रुग्णालय-स्किल लॅब) उभारण्यात आले आहे. सूर्यदत्त मल्टी डिसीप्लिनरी इंटिग्रेटेड कॅम्पस संकल्पनेंतर्गत हा अभिनव उपक्रम सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात होत आहे.
‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. २२ सप्टेंबर ते बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत हे प्रतीकात्मक रुग्णालय उभारण्यात आले असून, या रुग्णालयात विद्यार्थीच डॉक्टर, नर्स, औषध विक्रेते व रुग्णालयाशी संबंधित विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत अनुभव घेणार आहेत.
यामध्ये विविध ओपीडी, आयपीडी, आयसीयू, रेडिओडायग्नोसिस, मेडिकल अशा क्लिनिकल विभागांमधील कामकाजाचे प्रशिक्षण मिळेल. यासोबतच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे सराव, बेसिक लाईफ सपोर्टची प्रात्यक्षिके, मॉक ड्रिल्स यांचे आयोजन, हॉस्पिटल रेकॉर्ड्स, बिलिंग, डिस्चार्ज समरी अशा प्रशासनिक प्रक्रियांचाही विद्यार्थ्यांना अनुभव घेता येणार आहे. आरोग्य जनजागृती स्टॉल्स, पोस्टर्स आणि संवादात्मक उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांनाही आरोग्यविषयक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन आज सोमवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता होणार असून, पुण्यातील विविध रुग्णालयांतील ३० डॉक्टर, आरोग्यसेवक आणि औषधनिर्माण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांना ‘सूर्यदत्त धन्वंतरी हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना रुग्ण हाताळणीचा आत्मविश्वास मिळावा, त्यांच्यातील कौशल्य वृद्धिंगत व्हावीत, रुग्णालयीन कामकाज व प्रशासनिक प्रक्रिया यांचे सखोल आकलन व्हावे, यासाठी हा उपक्रम महत्वाचा असल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.