शबनम न्यूज | प्रतिनिधी
“राष्ट्राच्या विकासात स्थापत्य अभियंत्याचे महत्व अनन्यसाधारण असते. रस्ते, पूल, धरणे, कालवे, बंदरे, विमानतळे, गृहनिर्माण, शाळा-कॉलेजेस, रुग्णालयांसह पायाभूत सुविधांच्या उभारणीत त्यांचे योगदान मूलभूत आहे. त्यामुळे स्थापत्य अभियंत्यांनी नाविन्यता, जबाबदारी व कौशल्याची जोपासना करावी,” असे मत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांनी व्यक्त केले. प्रेम, आनंद व ज्ञान वाटत स्थापत्य अभियंत्यांनी नाविन्याचा ध्यास, प्रयत्नांची पराकाष्टा, जिद्द आणि चिकाटीने यश मिळवत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय अभियंता दिवसानिमित्त बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (बीएआय) आयोजित कार्यक्रमात डॉ. धुमाळ बोलत होते. रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बी. जी. शिर्के उद्योग समूहाचे उपाध्यक्ष आर. बी. सूर्यवंशी व एसकॉन प्रोजेक्टसचे संस्थापक निलेश चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रायोजक श्रीकन्स्ट फ्रेमवर्कचे संचालक दीपक जगदाळे व सहकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. ‘बीएआय’ महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, सचिव मनोज देशमुख, ‘बीएआय’ पुणेचे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे व महेश मायदेव, सचिव सी. एच. रतलानी, खजिनदार महेश राठी आदी उपस्थित होते.
आर. बी. सूर्यवंशी म्हणाले, “राष्ट्राच्या प्रगतीसाठी चांगल्या समाजाची निर्मिती व्हायला हवी. नागरिकांचे चारित्र्य स्वच्छ आणि त्यांना कर्तव्याची जाण असणे फार गरजेचे असते. सहा दशकांहून अधिक काळ बी. जी. शिर्के उद्योग समूहाच्या माध्यमातून या क्षेत्रात योगदान देतो आहे. स्थापत्य, बांधकाम शास्त्राचे औद्योगिकरण करण्यात मला योगदान देता आल्याचे समाधान आहे. निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी अपार कष्ट, सातत्य आणि नाविन्याचा ध्यास घ्यायला हवा, ही गोष्ट तरुण अभियंत्यांनी लक्षात घ्यावी.”
निलेश चव्हाण म्हणाले, “कष्ट, प्रामाणिकपणा आणि ध्येयवेडी वृत्ती यामुळेच यशाचा प्रवास शक्य झाला आहे. ग्राहकांचा विश्वास व सहकाऱ्यांची साथ हाच आमच्या कामाचा खरा पाया आहे. समाजाच्या विकासात बांधकाम क्षेत्र महत्त्वाची भूमिका असून, दर्जेदार व टिकाऊ प्रकल्प उभारणे ही आमची जबाबदारी आहे. आमच्या प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती, आधुनिक पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाला चालना मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे.” दीपक जगदाळे यांनीही त्यांच्या उद्योगाची वाटचाल उलगडली.
प्रास्ताविकात अजय गुजर म्हणाले, “स्थापत्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी अभियंता दिवसानिमित्त असा कार्यक्रम आयोजिला जातो. यातून तरुण अभियंत्यांना प्रेरणा मिळते.” कार्यक्रमाचे समन्वयक सुनील मते व सहसमन्वयक शिवकुमार भल्ला यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सी. एच. रतलानी यांनी आभार मानले.