शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील काळभोर नगर येथील महानगरपालिकेच्या सोपानराव विष्णू काळभोर माध्यमिक विद्यालयामध्ये दळवी नगर येथील महात्मा फुले शाळेच्या धर्तीवर पहिली ते दहावी सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करावे, अशी मागणी शादाब खान युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष शादाब खान यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शनिवारी झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात शादाब खान यांनी अजित पवार यांच्याकडे ही मागणी केली. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, आपल्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत आम्ही या पिंपरी चिंचवड उद्योग नगरीचा विकास व भरभराट “याची देही याची डोळा पाहत आहोत. आणि आता उद्योग नगरीचा हा विका`साचा रथ भरधाव दौडत आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने निघालेला आहे. परंतु जसे आपले शहर स्मार्ट सिटी व्हावे तसेच या उद्योग नगरीची भावी पिढी सर्व बाबतीत स्मार्ट असावी असे माझे मत आहे. आज या स्पर्धेच्या युगात तग धरण्यासाठी व्यवसाय व नोकरी निमित्त भारताच्या व जगाच्या कानाकोपऱ्यात नागरिकांना स्थलांतर करावे लागते व त्यासाठी स्पर्धेच्या युगात आपणाला टिकून राहण्यासाठी तग धरण्यासाठी इंग्रजी या भाषेचे ज्ञान व जान असणे आवश्यक आहे. कारण हीच आजच्या काळाची गरज आहे.
संविधान निर्माते व घटनाकार विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केलेले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी शिक्षण रुपी दूध पेईल तो गुरगुरेल यासाठी काळभोर नगर येथील मनपाच्या सोपानराव विष्णू काळभोर विद्यालयात दळवी नगर येथील महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या प्रमाणे प्रभाग क्रमांक 14 काळभोर नगर येथील महानगरपालिकेच्या पहिले ते दहावी इयत्तेमध्ये सेमी इंग्लिशच्या अभ्यासक्रम लागू करावा तसेच सोपानराव काळभोर विद्यालयात इयत्ता अकरावी व बारावीचे सेमी इंग्रजीचे वर्ग चालू करण्यात यावे.
या मागणीचे खरे कारण म्हणजे या मनपाच्या शाळांमध्ये (अपवाद सोडून)गरीब, कष्टकरी व आर्थिक अडचणींचा सामना करणारे व हातावर पोट असणारे कुटुंब आपल्या पाल्यांना शिकवायला पाठवतात त्यांना विनामूल्य मध्ये दर्जेदार शिक्षण घेता यावे हाच या मागचा उदात्त हेतू आहे .