शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी संपन्न होणारा आणि हजारो महिलांचा सहभाग असणारा ‘पुणे नवरात्रौ महिला महोत्सव’ यंदा वैभवशाली २७वे वर्ष साजरे करीत आहे. याचे उद्घाटन मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे यांच्या हस्ते श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे संपन्न होईल. समाजात उत्तुंग काम करणाऱ्या दोन महिलांना या महिला महोत्सवात दिला जाणारा ‘तेजस्विनी पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीत नाट्य कलावंत व गायिका दीप्ती भोगले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन करणाऱ्या आळंदी येथील ‘स्नेहवन’ संस्थेच्या अर्चना देशमाने यांना मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी महिला महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे. ५ हजार रुपये, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या २५०हून अधिक महिला सफाई कामगारांचा गौरवचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष गौरव करून कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे, अशी माहिती पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी दिली.
दीप्ती भोगले : जयराम आणि जयमाला शिलेदार या संगीत रंगभूमीवरील साधक दाम्पत्याची कन्या. संगीत रंगभूमीवर स्त्री भूमिकेपासून पुरुष भूमिकांपर्यंत स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान, पुणे विद्यापिठाची मराठी विषयाची एम.ए. पदवीधारक, वयाच्या सहाव्या वर्षापासून ६५ वर्षांपर्यंत रंगभूमीवर सुमारे ४००० प्रयोगांतून भूमिका, आकाशवाणीवरील ‘ए ग्रेड’ आर्टिस्ट, २७ नाटकांतून ४४ भूमिका, संगीत मैफलींचे निवेदन, संगीत नाट्यविषयक कार्यशाळा, ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धांमध्ये परीक्षक, जयराम शिलेदार यांच्या ‘सूरसंगत’ या आत्मचरित्राचे शब्दांकन, अनेक पुरस्कारांनी सन्मानित दीप्ती भोगले यांना ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे.
अर्चना देशमाने : आळंदी येथील ‘स्नेहवन’ संस्थेच्या अर्चना देशमाने यांनी पती
अशोक देशमाने यांच्यासमवेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १८०हून अधिक मुला-मुलींचे संगोपन, आरोग्य व शिक्षण यांची जबाबदरी स्वीकारून अखंडपणे त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिले आहे. आयटी इंजिनीअर असणाऱ्या अशोक देशमाने यांनी उत्तम नोकरी सोडून ‘स्नेहवन’ संस्था २०१५मध्ये सुरू केली. अर्चना देशमाने यांनी पतीला पूर्ण साथ देत या निराधार मुला-मुलींची ‘आई’ बनून या मुलांचे संगोपन, आरोग्य व शिक्षण त्या स्वतः करतात. या निराधार मुलांचे कल्याण हेच जीवनध्येय मानून काम करणाऱ्या अर्चना देशमाने या शेकडो तरुणांच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन त्यांना गौरविले जाणार आहे.
‘तेजस्विनी पुरस्कारा’च्या यापूर्वीच्या मानकरी : शीतल महाजन, शीतल सावंत, कीर्ती शिलेदार, सरस्वतीबाई राणे, सावनी रवींद्र, जयश्री फिरोदिया, केतकी माटेगावकर, ऋतुजा भोसले, शांताबाई किर्लोस्कर, प्राची बडवे, मीना फातर्पेकर, मृणालिनी चितळे, रोहिणीताई भाटे, ऋता बावडेकर, सरू वाघमारे, कल्याणी किर्लोस्कर, सुषमा खटावकर, मनीषा सोनवणे , मुग्धा धामणकर, जुई सुहास आदी.