शबनम न्यूज | प्रतिनिधी
लायन्स क्लब इंटरनॅशनल पीस पोस्टर २०२५ – २६ या आंतरराष्ट्रीय विश्वशांती चित्रकला स्पर्धा उपक्रमांतर्गत कुदळवाडी, चिखली येथील पी सी एम सी पब्लिक स्कूल क्रमांक ८९ या शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने शनिवार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सहभाग घेत चित्रकलेतून विश्वशांतीचा संदेश दिला. याप्रसंगी लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी – २ चे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन एम जे एफ लायन सलीम शिकलगार, लायन्स क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षा रश्मी नायर, चंद्रशेखर पवार, शिवकन्या मुसमाडे, शिल्पी कुमार, अजितकुमार देशपांडे, उपमुख्याध्यापक मारुती खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सलीम शिकलगार यांनी विद्यार्थ्यांना उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, ‘आज जगात वेगवेगळ्या देशांमध्ये सत्तासंघर्ष आणि लढाया होत आहेत. त्यामुळे जागतिक शांतता, बंधुभाव, मानवता धोक्यात आलेली आहे. यासाठी सुमारे शंभर वर्षांहून अधिक काळ सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली लायन्स क्लब इंटरनॅशनल ही सेवाभावी संस्था प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून शांतीचा संदेश देत असते. यावर्षी जगातील २०९ देशांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून ‘टुगेदर ॲज वन’ अर्थातच ‘विश्वशांतीसाठी एकजूट करू या…’ हा यावर्षीच्या चित्रकला स्पर्धेचा विषय आहे. अकरा ते चौदा हा विद्यार्थ्यांचा वयोगट खूप संस्कारक्षम असतो. त्यामुळेच हा वयोगट लक्षात घेऊन ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व साहित्य लायन्स क्लबच्या वतीने पुरविण्यात येते. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला सुमारे पाच हजार डॉलर्सचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार असून विजेता विद्यार्थी, त्याचे आईवडील आणि चित्रकला शिक्षक यांना लायन्स क्लबच्या वतीने परदेशातील मुख्य सोहळ्यासाठी नेण्यात येईल. याशिवाय लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी – २ च्यावतीने जिल्हा पातळीवरील शाळांमधून हा उपक्रम राबविण्यात येणार असून प्रथम क्रमांक (रोख रक्कम अकरा हजार फक्त), द्वितीय क्रमांक (रोख रक्कम पाच हजार फक्त) आणि तृतीय क्रमांक (रोख रक्कम तीन हजार फक्त) प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. आपल्या कुटुंबात कोणताही वाद, कलह, द्वेष नसावा असे आपल्याला वाटते. हीच भावना जगातील सर्व देशांमध्ये असावी; तसेच विश्वशांती, ऐक्य आणि बंधुभाव वाढावा, अशी संकल्पना आपल्या चित्रातून साकार करा!’
यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले; तसेच उपमुख्याध्यापक मारुती खामकर यांना शाळा सहभाग प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. शाळेतील शिक्षकवृंदाने उपक्रमासाठी सहकार्य केले.