spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मनमानी कारभाराविरोधात विविध क्रीडा संघटनांचे २३ सप्टेंबरला आंदोलन

शबनम न्यूज | प्रतिनिधी
ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या विविध संघटनांना पंचवार्षिक निवडणुकीपासून मतदानाचा अधिकार बजावण्यापासून दूर ठेवत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी केलेल्या मनमानीविरोधात राज्यातील विविध क्रीडा संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिरगावकरांच्या या बेकायदेशीर कृतीविरोधात येत्या मंगळवारपासून (ता. २३) तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजपा किडा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला अर्जुन पुरस्कार विजेते बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे, सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, हँडबॉल संघटनेचे सरचिटणीस राजाराम राऊत, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, तायक्वांदो खेळाडू मिलिंद पाठारे आदी उपस्थित होते.
संदीप भोंडवे म्हणाले, “महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सरचिटणिस नामदेव शिरगावकर यांनी १५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक काढून २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच निवडणुकीत मतदानास पात्र २२ क्रीडा संघटनांची यादी जाहीर केली. यामधून कुस्ती, कब्बडी, बॉक्सिंग, स्विमिंग व हॅण्डबॉल या संघटनांना वगळण्यात आले. यापूर्वीच्या निवडणुकीत या पाचही संघटना पात्र होत्या. असोसिएशनशी संलग्नित ४७ ते ४८ संघटना असतानाही केवळ राजकारणासाठी व स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिरगावकर यांनी फक्त २२ संघटनांना मतदानासाठी पात्र ठरवले आहे. त्यांचे हे कारस्थान जाणूनबुजून केलेले असून, यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंचे मोठे नुकसान होणार आहे.”
“गोवा, उत्तराखंड आणि गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंसाठी महाराष्ट्र शासनाने दरवर्षी चार कोटी याप्रमाणे तीन वर्षांसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला १२ कोटींचा निधी दिला आहे. मात्र, असोसिएशनकडून या निधीच्या विनियोगाचा तपशील सादर केला नाही. यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. करोडो रुपयांचा हिशोब न देता लाखो रुपये स्वतःच्या खिशात घालण्याचे काम शिरगावकर यांनी केले असल्याचे आमचे ठाम मत आहे. शिरगावकर यांच्या मनमानी कारभाराला त्रासलेल्या विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत,” असेही संदीप भोंडवे यांनी नमूद केले.
संदीप भोंडवे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनला संलग्न सर्व राज्य खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार प्राप्त व्हावेत, तसेच गोवा, गुजरात व उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राज्य शासनाने दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा हिशोब महाराष्ट्र ऑलिंपिंक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार व महासचिव नामदेव शिरगावकर यांनी राज्य शासनास सादर करावा, अशी आमची मागणी आहे. या दोन्ही मागण्या मान्य होण्यासाठी येत्या, २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथून आंदोलनास सुरूवात होईल. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनात मान्यताप्राप्त विविध राज्य क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असून, साखळी उपोषण करणार आहेत.”

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!