शबनम न्यूज | प्रतिनिधी
कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. बांबू लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी बांबूची सशक्त व शाश्वत बाजारपेठ तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित बांबू परिषदेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण, गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल, गुजरातचे माजी मंत्री भूपेंद्रसिंग चुडासामा आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन लवकरच बांबू उद्योग धोरण तयार करणार आहे. त्यामध्ये बांबू क्षेत्राच्या बाजारपेठेसंदर्भात विचार केला जाईल. मात्र, धोरण तयार करतानाच बांबू लागवडीसंबंधी जनजागृती होणे आवश्यक आहे. पाशा पटेल यांनी मोठ्या प्रमाणावर बांबूला लोकचळवळीत परिवर्तीत करण्याचे काम केले आहे. बांबू क्षेत्रासंबंधी जनजागृती करण्याचे काम ते करतील आणि यासंबंधीचे धोरण सरकार तयार करेल.
शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवण्यासाठी बांबू हा महत्त्वाचा पर्याय आहे. हवामान बदलाच्या परिणामांना सतत सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बांबू हे शाश्वत पीक ठरू शकते. ऊस शेतीसारखे बांबू पीक आहे. एकदा लागवड केली की त्याकडे वारंवार लक्ष द्यावे लागत नाही. कापूस, सोयाबीनसारख्या पिकांना हवामान बदलाचा फटका बसतो, पण बांबू लागवड केली तर त्याचा परिणाम कमी करता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.