शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्याच्या महसूल आणि वन विभागामार्फत येत्या बुधवारपासून (१७ सप्टेंबर) सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार असून, त्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातून होणार आहे. या सेवा पंधरावड्यात महसूल विभागामार्फत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीचे वितरण, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा, नाॅन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, आधारकार्ड सुविधा दिल्या जाणार आहेत. येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
या अभियानाचा उद्घाटन समारंभ गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. महसूल, ग्रामविकास, नगररचना, आरोग्य, ऊर्जा, सामाजिक न्याय, महिला आणि बालकल्याण तसेच आदिवासी विभागाच्या विविध सेवा नागरिकांच्या दारात पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
सेवा पंधरावड्यात महसूल विभागामार्फत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीचे वितरण, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा, नाॅन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, आधारकार्ड सुविधा दिल्या जाणार आहेत. ग्रामविकास आणि नगर प्रशासन विभागामार्फत मालमत्ता नोंद, नळजोडणी, विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदी आणि प्रमाणपत्र वितरण, मालमत्ता कर आकारणी या सेवा उपलब्ध करून दिल्या जातील.