शबनम न्यूज | प्रतिनिधी
महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार मार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर, मध्य प्रदेश येथे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यभर होणार असून राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर, रंगस्वर सभागृह नरिमन पॉईंट येथे मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री, मा. राज्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरात त्याच दिवशी प्रत्येक जिल्हा व महापालिका स्तरावर महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यात विविध आरोग्य शिबिरे, तपासण्या आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, नागरिकांना या सर्व सेवांचा व्यापक लाभ मिळावा यासाठी वैद्यकीय विभागाच्या वतीने विशेष नियोजन केले आहे. सदर अभियानाचा शुभारंभ महानगरपालिके मार्फत सन्माननीय लोक सभा सदस्य , विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य तसेच आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते तालेरा रुग्णालय, कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय व कै. ह.भ.प. मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, आकुर्डी येथे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सदरची शिबिरे महानगरपालिकेच्या आठही रुग्णालयात तसेच ३१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे दैनंदिन (१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत) आयोजित करण्यात आलेली आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत सर्व महिलांना आवाहन करण्यात येते कि, सदर शिबिरातील विविध सेवांचा लाभ घ्यावा.