शबनम न्यूज | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पं. दीनदयाळ उपाध्याय आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा २०२५’ हे अभियान देशभर राबवणार आहे. या अभियानाच्या तयारीसाठी पिंपरी-चिंचवड शहराची जिल्हा कार्यशाळा पिंपळे सौदागर येथे पार पडली. या कार्यशाळेत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता प्रदेश महामंत्री श्री.राजेश पांडे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे,आमदार महेश लांडगे,आमदार शंकर जगताप आणि आमदार अमित गोरखे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या सर्व नेत्यांनी ‘सेवा पंधरवडा’ यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे सल्ले दिले.
कार्यशाळेत बोलताना श्री. राजेश पांडे यांनी ‘सेवा पंधरवडा’ अभियानाचा मुख्य उद्देश ‘संघटन हीच शक्ती आणि सेवा हेच ध्येय’ हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात रुजविणे आहे असे सांगितले. त्यांनी बूथ आणि मंडल स्तरावर हे अभियान प्रभावीपणे राबवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचे आवाहन केले. जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांना मदत करणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, आणि स्वच्छता अभियानांचा समावेश आहे. याशिवाय, दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, वृक्षारोपण, ‘वोकल फॉर लोकल’चा प्रचार, मोदी विकास मॅरेथॉन, ‘विकसित भारत’ चित्रकला स्पर्धा, आणि खादी वस्तूंची खरेदी अशा अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले. आमदार महेश लांडगे यांनी हे अभियान एक ‘सेवायज्ञ’ असून यात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आमदार शंकर जगताप आणि आमदार अमित गोरखे यांनीही ‘सेवा पंधरवडा’ यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर आमदार महेश दादा लांडगे,आमदार शंकर जगताप,आमदार अमित गोरखे,माजी आमदार अश्विनीताई जगताप,प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे,माजी महापौर नितीन काळजे,दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले,सरचिटणीस मोरेश्वर शेडगे,विकास डोळस,मधुकर बच्चे,वैशाली खाड्ये, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे,युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे,माजी नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे,जिल्हा प्रवक्ते कुणाल लांडगे,मंडल अध्यक्ष गणेश ढोरे,मोहन राऊत,सोमनाथ तापकीर, अनिता वाळुंजकर, शिवराज लांडगे ओबीसी मोर्चा अध्यक्ष चेतन भुजबळ,राम वाकडकर,राजाभाऊ मासूळकर, यशवंत भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवक- नगरसेविका आणि प्रकोष्ठ अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांमध्ये सेवाभावाची भावना अधिक दृढ झाली असून, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा संकल्प आणखी बळकट झाला आहे.
प्रास्ताविक अभियान संयोजक वैशाली खाडेय यांनी केले व आभार महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे यांनी मानले.
सुत्रसंचालन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले.