spot_img
spot_img
spot_img

चेटीचंड महोत्सवातून घडले सिंधी संस्कृतीचे दर्शन

सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०७५ वा जन्मोत्सव व सिंधी नववर्षाचा आनंदोत्सव
पुणे : ‘आयो लाल झुलेलाल’च्या जयघोषात भगवान साई झुलेलाल यांची भक्तीभावाने केलेली आरती… झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचे पूजन… सिंधी गीतांची बहारदार मैफल… कलात्मक नृत्याविष्कार… चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद… रुचकर लंगर… डोक्यावर लाल टोपी आणि साई झुलेलाल यांचे ‘लाल झुले लाल झुले लाल झुलेलाल’ हे अखंड भजन अशा भावभक्तीमय वातावरणात सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले.
सिंधी समाजाचे नवीन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७५ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सव आयोजिला होता. येरवड्यातील डेक्कन कॉलेजच्या बँक्वेट हॉल व मैदानावर झालेल्या या महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी, प्रियांशी कर्वाणी, रीतिका सुंदरानी, अमान सुंदरानी यांच्यासह १७ गायक कलाकारांसह देवांश एंटरटेनमेंट प्रस्तुत सिंधी सिम्फनी बँड, सिंधी ऑर्केस्ट्राचा लाईव्ह कॉन्सर्टने उपस्थितांची मने जिंकली. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे आकर्षक नृत्यकलेचे सादरीकरण झाले. प्रीतिभोजने (महाप्रसाद) महोत्सवाची सांगता होईल. पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील चार-साडेचार हजार सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी झाले.
मिलेनियम सेमीकंडक्टर्स इंडियाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हरेश अभिचंदानी यांच्या हस्ते साई झुलेलाल यांची महाआरती झाली. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी, संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, माजी अध्यक्ष मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, पीटर दलवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पर्यानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार राजेंद्र फेरवानी, सहखजिनदार निलेश फेरवानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला, जय पिंजानी आदी उपस्थित होते.
अशोक वासवानी म्हणाले, “सिंधी संस्कृती विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सिंधू सेवा दल गेली ३८ वर्ष कार्यरत आहे. चेटीचंड महोत्सवानिमित्त सर्व समाज एकत्र येतो. भगवान साई झुलेलाल यांचा उत्सव साजरा करतो. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यामध्ये सहभागी होतो.”
————

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!