शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांनी जिल्हास्तरीय (रिंग टेनिस) स्पर्धा – १४ वर्षे मुलांचा गट मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड विभागातील ४४ शाळांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चार शाळांनी टॉप ८ मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच छत्रपती शाहूजी महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कासारवाडी या शाळेची विद्यार्थिनी अविन्या साबळे हिने जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा (वय वर्ष १७ मध्ये ४५ किलो वजन गट – मुली) मध्ये रौप्य पदक पटकावले.
स्पर्धेच्या निकालानुसार, कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळा, काळेवाडी ही शाळा प्रथम क्रमांकावर राहिली व सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. तसेच विभागीय स्तरावरील पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरली. सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यम शाळा, मोशी ही शाळा तिसऱ्या क्रमांकावर राहिली. तर श्रीमती अनुसयाबाई नामदेव वाघेरे इंग्रजी माध्यम शाळा, पिंपरी ही शाळा चौथ्या क्रमांकावर तसेच छत्रपती शाहूजी महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कासारवाडी ही शाळा सातव्या क्रमांकावर राहिली.
दरम्यान, शाळांमध्ये क्रीडा हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. संघभावना, सामंजस्य, नेतृत्व, चिकाटी आणि धैर्य या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी क्रीडा स्पर्धा अत्यंत आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये अशा स्पर्धांचे आयोजन नियमितपणे केले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा फक्त शैक्षणिक विकास होत नाही तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासही साधला जातो, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहेत :
• कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळा, काळेवाडी – १ ला क्रमांक (सुवर्ण पदक, विभागीय स्तरासाठी पात्र)
• सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यम शाळा, मोशी – ३ रा क्रमांक
• श्रीमती अनुसयाबाई नामदेव वाघेरे इंग्रजी माध्यम शाळा, पिंपरी – ४ था क्रमांक
• छत्रपती शाहूजी महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कासारवाडी – ७ वा क्रमांक