शबनम न्यूज | प्रतिनिधी
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५’मध्ये पुणे देशात दहाव्या स्थानी आले आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशभरातील मोठ्या शहरांच्या श्रेणीत पुणे शहराने हा क्रमांक मिळवला. गेल्या वर्षी पुणे २३ व्या क्रमांकावर होते.
केंद्र सरकारच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले. देशपातळीवरील अनेक मोठी शहरे यामध्ये सहभागी झाली होती. या सर्वेक्षणात मध्य प्रदेशातील इंदूरने प्रथम क्रमांक पटकविला. मध्य प्रदेशातीलच जबलपूर शहराने दुसरा क्रमांक, तर उत्तर प्रदेश येथील आग्रा आणि गुजरात येथील सुरत यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळविला.या सर्वेक्षणात वायू गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग, शाश्वत उपाययोजना आणि प्रशासनाची भूमिका अशा विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात येते.
या सर्वेक्षणात १३० हून अधिक शहरांचा समावेश होता. हवेची गुणवत्ता, कचरा व्यवस्थापन, औद्योगिक उत्सर्जन, रस्त्यावरील धूळ नियंत्रण, सार्वजनिक जागरूकता, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि हरित उपक्रम अशा विविध निकषांवर शहरे तपासण्यात आली.