spot_img
spot_img
spot_img

भक्तिगीतांनी भक्त स्वामीमय पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव

पिंपरी (दिनांक : ३१ मार्च २०२५) पंडित योगेश तपस्वी आणि सहकारी यांनी सादर केलेल्या श्री स्वामी समर्थ आणि मांदियाळीतील सत्पुरुषांवरील भक्तिगीतांनी भक्त स्वामीमय झाल्याची अनुभूती रविवार, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे सर्व उपस्थितांना आली. पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवातील चतुर्थ पुष्प पंडित योगेश तपस्वी आणि सहकारी यांनी सांगीतिक मैफलीच्या माध्यमातून गुंफले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगावचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
मैफलीचा प्रारंभ श्री स्वामी समर्थ आणि मांदियाळीतील सत्पुरुषांच्या सांगीतिक नामजागराने करण्यात आला. ‘स्वामी या हो…’ या प्रार्थनेने वातावरण भक्तिमय झाले; तर ‘स्वामी सद्गुरुनाथा माझे आई…’ , ‘सुंदर ते ध्यान वटवृक्षातळी…’ या भक्तिरचनांनी भक्तिरंग अधिकच गहिरा झाला. ‘भक्तजनों के साथ तुम्हारा भरा दरबार रे…’ या कव्वालीला श्रोत्यांनी दाद दिली. ‘चला जाऊ अक्कलकोटी…’ , ‘गुरू पूर्णब्रह्म भगवंत…’ या गीतांना टाळ्यांच्या रूपाने पसंतीची पावती मिळाली. ‘मेण्यातून बसुनी निघाली स्वामींची स्वारी…’ , ‘मठाच्या दिशेने पाऊले…’ या मराठी भक्तिगीतांसोबतच ‘तेरा नाम गाऊ निसदिन…’ या हिंदी रचनेलाही श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. सामुदायिक तारकमंत्रानंतर ‘हम गया नही जिंदा हैं…’ या लोकप्रिय सूफी कव्वालीने मैफलीची सांगता करण्यात आली. गीतांचे सादरीकरण करताना योगेश तपस्वी यांनी अधूनमधून केलेल्या मार्मिक टिप्पणीमुळे मैफल अधिकच रंगतदार झाली. उदय शहापूरकर (हार्मोनियम), पद्माकर गुजर (तबला), प्रतीक गुजर (पखवाज) आणि पराग मराठे, जयदीप मराठे, अतुल बांदल, अशोक ससाणे (तालवाद्य आणि गायनसाथ) यांनी नेटकी साथसंगत केली. 
कार्यक्रमापूर्वी, श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे संस्थापक कै. त्रिंबक भट यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीमती भावना भट यांनी पुरस्कार स्वीकारला. 
प्रकटदिन उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींचा सुगंधी द्रव्याने अभिषेक आणि पूजा,  श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार आणि पूर्णाहुती, महानैवेद्य, माध्यान्ह आणि सायंकालीन आरती, धनेश्वर एकतारी भजन मंडळाची भजनसेवा इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. कैलास गावडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कैलास भैरट यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!