शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्याच्या युवा धोरणाच्या आराखड्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीवर पिंपरी-चिंचवडचे युवा आमदार अमित गोरखे यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. “ही समिती मा. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल.
युवकांचे शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, उद्योजकता, क्रीडा, कला, संस्कृती आणि सामाजिक सहभाग यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर हे धोरण लक्ष केंद्रित करणार आहे. युवकांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देणारे दूरदृष्टीचे धोरण तयार करणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे.
यापूर्वीही पिंपरी -चिंचवडचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांची प्रतिष्ठित इंडो-चायना युथ फेस्टिवल ,चायना मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. देशातून एका प्रतिनिधीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असते.
याआधीही त्यांच्या अतुलनीय सामाजिक व सार्वजनिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०११-२०१२ मध्ये केंद्र सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार तसेच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्य सरकार कडून शिक्षण रत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यातील युवा वर्गात आनंदाचे वातावरण आहे. विविध स्तरांतून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या नव्या जबाबदारीबद्दल बोलताना आमदार गोरखे म्हणाले, “राज्यातील युवक हेच आपल्या राज्याचे आणि देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या क्षमतांना वाव देऊन, आकांक्षांना न्याय देणारे धोरण तयार करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. आमचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. या समितीच्या माध्यमातून मी ग्रामीण तसेच शहरी भागातील युवकांच्या गरजा आणि अपेक्षा प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करेन.”
आमदार गोरखे यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्या योगदानातून युवा धोरणाला एक नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.