शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सरकारने कारखाने अधिनियम 1948 व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमामध्ये सुधारणा करून कारखाने व दुकाने-आस्थापनांमधील कामगारांच्या कामाच्या तासांत वाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा अन्यायकारक व कामगार विरोधी असल्याचा तीव्र निषेध आम आदमी पार्टीच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडी व कामगार आघाडीकडून करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार कारखान्यांमधील कामाचे तास 9 वरून 12 तर दुकाने-आस्थापनांमधील कामाचे तास 9 वरून 10 इतके करण्यात आले असून आठवड्याचे कामाचे तास 48 वरून तब्बल 60 करण्यात आले आहेत. ओव्हरटाईमची मर्यादाही वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी कामगारांच्या हिताचे संरक्षण व्हावे, अशी मागणी केली आहे.
आम आदमी पार्टी अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे अध्यक्ष विकी रोहिदास पासोटे व कामगार आघाडीचे अध्यक्ष शुभम यादव यांनी म्हटले आहे की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 12 तासांचा कामाचा दिवस कमी करून 8 तासांचा केला होता. आज सरकार पुन्हा 12 तासांचा दिवस लादत आहे, हा निर्णय संविधानविरोधी व शोषणकारी आहे. कामगारांच्या हक्कांवर घाला घालणारा हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल.”
नेत्यांनी पुढे सांगितले की, “सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा कामगार वर्ग व संघटना रस्त्यावर उतरून कठोर भूमिका घेतील.